सोलापूर : सोलपुरात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 13 जुलै रोजी संध्याकाळी घडला होता. दोन मुलं आणि पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याने संपूर्ण सोलापुरात या प्रकरणाने खळबळ माजली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी सोलापूर महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकाला अटक केली आहे. लक्ष्मण यल्लप्पा जाधव असं या आरोपी नगरसेवकाचे नाव आहे. सोलापूर आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने आरोपीला कर्नाटक हद्दीतून ताब्यात घेतलं आहे. तसेच नगरसेवकासह आणखी एकास देखील पोलिसांनी या प्रकरणी आज अटक केली आहे. आतापर्यत या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मृत अमोल जगताप सोलापुरातील कोंडी परिसरात हॉटेल गॅलेक्सी ऑर्केस्ट्रा बार चालवत होते. अमोल जगताप यांनी नगरसेवक लक्ष्मण जाधव आणि आणखी तीन जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. विनापरवाना तसेच बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांकडून पैसे घेतले होते. आरोपींनी मृताकडे पैशांसाठी तगादा लावल्याचे देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणामुळे अमोल जगताप यांनी आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
13 जुलै रोजी संध्याकाळी 6.50 च्या सुमारास अमोल यांनी आपल्या भावाला फोन केला होता. आपण आपल्या दोन्ही मुले आणि पत्नीची हत्या केल्याचे त्यांनी या फोनवर सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृताचे भाऊ राहुल अशोक जगताप यांनी या प्रकरणात पोलिसात फिर्य़ाद दिली आहे. या प्रकरणाचा तपास करताना हॉटेल व्यवसायाकरिता फिर्य़ादी आणि मयत अमोल जगताप यांनी आरोपींनीकडून व्याजाने पैसे घेतले होते. आरोपींनी सावकरी परवाना नसताना, ज्यादा व्याज दराने पैसे व्याजाने देऊन ते परत घेण्यासाठी तगादा लावला होता. तसेच शिवीगाळ करुन, दमदाटी केल्याने मयत अमोल जगताप याने डिप्रेशनमध्ये जाऊन पत्नी आणि दोन मुलांना गळफास देऊन ठार मारुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक लक्ष्मण यल्लप्पा जाधव आणि दशरथ कसबे यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांना पोलीस अटक करणार असल्याची माहिती कळताच त्यांने मोटारसायकलवर विजापूरच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पोलिसांना कळताच गुन्हे शाखेचे सपोनि अजित कुंभार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी निघाले. सोलापूर-कर्नाटक सीमेवर असलेल्या तेरामैल या ठिकाणी आरोपी नगरसेवक लक्ष्मण जाधव दुचाकीवरुन डबलशिट जात असल्याचे दिसले. पोलिसांनी गाडी थांबवण्यास सांगितले असता गाडी वेगाने चालवत कर्नाटकातील धुळखेड येथे गेले. धुळखेड येथे गाडी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतलं. कर्नाटकातल्या झळकी पोलीस ठाणाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सविस्तर रिपोर्ट देऊन गुन्हे शाखेने आरोपी नगरसेवक लक्ष्मण जाधव यास अटक केली आहे.
तर याच गुन्ह्यात सोलापुरात प्रसिद्ध असलेल्या एका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असलेल्या दशरथ कसबे याला देखील पोलिसांना अटक केली आहे. आरोपी दशरथ कसबे याने देखील मृतास ज्यादा व्याजदराने मोठी रक्कम दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासकामासाठी आरोपी दशरथ कसबे यालाही अटक कऱण्यात आली आहे. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान खासगी सावकारीतून ज्या नागरिकांना मुद्दल आणि व्याज मिळवण्यासाठी कुणी त्रास देत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखात तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.