मुंबई : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेसाठी वेगाने हालचाली होऊ लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष राज्यात सत्तास्थापन करणार आहेत, ही बाब काल (21 नोव्हेंबर) तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केली आहे. आज या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्रात महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीत शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होणार आहे.


नेहरु केंद्रात सुरु असलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह केल्याची माहिती मिळाली आहे. महाविकासआघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असा सूर या बैठकीत पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री हा महाविकासआघाडीमधील सर्व पक्षांच्या आमदारांचे, गटनेत्यांचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना असे वाटते की, उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे. महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री, तसेच आतापर्यंत अनेकवेळा कॅबिनेट मंत्रीपदं भूषवलेले नेते असणार आहेत. त्यामुळे अशा नेत्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असे आघाडीतील नेत्यांचे मत आहे.

जो व्यक्ती महाविकासआघाडीचं नेतृत्व करेल, त्या व्यक्तीबाबत मंत्रीमंडळातील सर्वच नेत्यांच्या मनात आदराची भावना असायला हवी. शिवसेनेत अशी एकच व्यक्ती असल्याचे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी घ्यायला हवी, असा शरद पवारांचा आग्रह आहे.

दरम्यान, ठाकरे कटुंबांच्या आतापर्यंतच्या इतिहासात ठाकरे घरातील कोणत्याही व्यक्तीने कधीही मंत्रीपद भूषवलेले नाही. ठाकरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नेहमीच मंत्रीपदापासून दूर राहात आलेली आहे. त्यामुळे  उद्धव ठाकरे हे 'वर्षा'वर राहून राज्याचा कारभार पाहणार की, 'मातोश्री'वर राहून सत्तेचा रिमोट कंट्रोल सांभाळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्यास नकार दिला तर शिवसेनेकडून संजय राऊत यांनी ही जबाबदारी घ्यावी, असेही मत आघाडीतील नेत्यांचे आहे. महाविकासआघाडी जुळवून आणण्यासाठी संजय राऊत यांनी खूप मेहनत केली आहे. तसेत राऊत हे शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीकडून संजय राऊत यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

 'हे' आहेत शिवसेनेतील मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार | ABP Majha



शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यासमोरची पाच प्रमुख आव्हानं? ABP Majha



शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कुठल्या नेत्याला कोणतं मंत्रीपद? | एबीपी माझा