पंढरपूर :  राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. असे असताना सगळे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मात्र शेतकरी आणि दुष्काळासाठी काम करत आहे. जागावाटप खड्ड्यात गेलं, आधी शेतकऱ्यांचं बघा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी पंढरपुरातील सभेत दिला आहे. यावेळी त्यांनी दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीकविमासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार फटकारे ओढले. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत असतात तिथे राष्ट्रीय पक्षाला धूळ चारली आहे असे सांगत त्यांनी भाजपला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सोडवा
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, शेतकरी संकटात आहे. असे असताना त्यांना योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी देखील व्यवस्थित झालेली नाही. पीकविम्यामध्येही मोठा घोटाळा झाला आहे. यावरून कांदा प्रश्न कशी सोडवताय? पीकविमा कधी देताय ते सांगा?  कर्जमाफ केलेला शेतकरी दाखवा असा खडा सवाल करत या गोष्टी पहिल्यांदा पूर्ण करा, नंतर बाकीचं बघू असे म्हटले. मला सत्ता नसली तरी चालेल, मात्र इथला शेतकरी सुखी राहायला हवा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. जानेवारीपासून मी स्वतः दुष्काळग्रस्त भागात फिरणार आहे, असे ते म्हणाले. मराठवाडा विदर्भात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. केंद्राच्या पथकानं पाहणी केली मात्र शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजना कुठं गेल्या? असेही ते म्हणाले. पीक विम्याच्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून बोगस पीक विम्याच्या कंपन्यांवर कारवाई करा, असे त्यांनी सांगितले.

अयोध्येला कुंभकर्णाला जागे करायला  गेलो होतो
वेगवेगळ्या जातींच्या न्याय हक्कासाठी सोबत लढणार असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले. मी बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन जातोय. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना सोबत असेल असेही ते म्हणाले. अयोध्येला कुंभकर्णाला जागे करायला  गेलो होतो, इथंही कुंभकर्णाला जागे करायलाच आलोय, असा टोलाही त्यांनी लगावला.

राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच
राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच, असा निर्धारही त्यांनी पुन्हा बोलून दाखवला. ५ राज्याच्या निकालांनी सत्तांध लोकांना हादरा बसला आहे. त्यामुळे  कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू तुला सोडणार नाही, असेही ते म्हणाले. हल्ली पहारेकरीसुद्धा चोऱ्या करायला लागला असा निशाणा देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर लगावला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही तुमची आरती करायची का? असा सवालही त्यांनी केला. नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांचं अभिनंदन करतो कारण त्यांच्यापुढे भाजपा झुकली. राममंदिराबद्दल पासवान आणि नितीशकुमार यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे ठाकरे म्हणाले. मी ताकाला जाऊन भांड लपविणारा माणूस नाही. निवडणुका आल्या की ह्यांच्या अंगात देव घुमायला लागतो. आम्ही बावळट हिंदू नाहीत, अशा शब्दात भाजपला सुनावले.

जय जवान- जय किसानचा नारा खोटा ठरवला
यावेळी बोलताना ठाकरे यांनी राफेल घोटाळ्यावरूनही टीका केली. सैन्यासाठी विमानं खरेदी करता त्यात तुम्ही घोटाळे करता. दुसरीकडे सैन्याची पगारवाढ प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आहे. सैन्याची पगारवाढ नाही आणि शस्त्र सामग्रीत घोटाळा करता, किती पापं कराल, असे म्हणत जय जवान- जय किसानचा नारा खोटा ठरवला आहे, असे ठाकरे म्हणाले.

ज्यांनी माझ्या जनतेचं वाकडं केलं त्यांचं आम्ही वाकडं करणार
ज्यांनी माझ्या जनतेचं वाकडं केलं त्यांचं आम्ही वाकडं करणार, असा इशाराच देताना युती करायची की नाही हे जनता ठरवेल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. कांदा राखून ठेवा, ते बेशुद्ध पडले की त्यांना सावध करायला उपयोगाला येतील, असेही ते म्हणाले. तुम्ही कितीही क्लीनचिट वाटत फिरा, मात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असे ठाकरे म्हणाले.

हे सरकार पुन्हा आणीबाणी आणण्याचा प्रयत्न करतेय. जनतेच्या वैयक्तिक आयुष्यात घुसखोरी करत आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. छत्तीसगडमध्ये जशी घाण खाली केली तशी महाराष्ट्रातली घाण खाली करा, असेही ते म्हणाले. गावागावातील शिवसेनेच्या शाखा शेतकऱ्यांचे आवाज केंद्र बनतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. नडण्याचा प्रयत्न करू नका, फोडून काढू, अशा शब्दात थेट इशारा ठाकरे यांनी दिला आहे.