मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्राचे घोळ घातले. भाजपाने शब्द देऊनही तो पाळला नाही. बहुमताचा आकडा गाठण्यात शिवसेनेला यश येईल.  महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शस्त्रक्रियेनंतर 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत व्यक्त केला.


शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. छातीत दुखत असल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होत. लिलावतीमधील ज्येष्ठ हृदयतज्ज्ञांच्या देखरेखीखाली राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान काळजी करण्यासारखं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

राज्यपालांकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने  दिलं नाही त्यामुळे शिवसेनाला दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करता आले नाही. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, काँग्रेस – राष्ट्रवादी नेत्यांनी पत्राचे घोळ घातले त्यामुळे शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले नाही.

EXCLUSIVE | रूग्णालयातून संजय राऊत यांचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट | ABP Majha



राज्यपालांनी सर्वांवर अन्याय केला असा आरोप करताना भाजपावरही त्यांनी पुन्हा एकदा सडकून टीका केली. मुख्यमंत्री पद ठरवूनही ते भाजपाने दिलं नाही. भाजपाने शब्द देऊनही पाळला नाही. सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. भाजपाने स्वत: सत्ता स्थापन केली नाही आणि इतरांना देखील स्थापन करू दिली नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला. मध्यावधी निवडणुकीचा दावा नाकारत  मध्यावदी निवडणुकीची चर्चा ही अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केल.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत जी युती होती त्यात आमची फाटाफूट झालेली आहे. त्यानंतर राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही महाशिवआघाडी केली म्हणजे धर्मांतर केलेलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करताना हिंदुत्व आड येणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

कामाची सवय असेल तर स्वस्थ बसवत नाही त्यामुळे आजही रुग्णालयातून नेहमीप्रमाणे अग्रलेख लिहिला. दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी शांत राहण्याचा सल्ला दिल्याचे ते यावेळी म्हणाले.