पालघर : पालघर  नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा सुटल्याचं चित्र आहे. आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजप राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे पालघरमध्ये नगराध्यक्षपद शिवसेनेचा होणार असून शिवसेना 19 आणि भाजप 9  जागा अशा पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कडून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांचे समाधान करण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. काही निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून आली आहे. दुसरीकडे भाजपकडे लढण्यासाठी पुरेसे उमेदवारच नसल्याने त्यांच्या जागा आपोआप कमी झाल्या आहेत. दरम्यान पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यावरही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते रवींद्र चव्हाण व पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. तसेच आमदार पास्कल धनारे व शिवसेना-भाजपा पदाधिकारी यांनीही आचारसंहितेचा भंग केला आहे. पालघर अग्निशमन केंद्रात नगरपरिषद निवडणूक कार्यालय आहे. या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच्या सर्व प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस असल्याने नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार या ठिकाणी दाखल होत होते. उमेदवार व सूचक यांनाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालयात जाण्याची परवानगी असताना एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि खासदार राजेंद्र गावित यांनी शिवनेसा-भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह थेट आत शिरुन आचारसंहितेचा भंग केला. पोलिसांनी या सर्वांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी थेट प्रवेश केल्यामुळे मंत्र्यांसमोर या पोलिसांनीही बघ्याची भूमिका स्वीकारली. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे.