मुंबई: राणा दाम्पत्य (Navneet Rana and Ravi Rana) हे आव्हानाची भाषा करत मुंबईत आले आणि आता घरात लपून बसले. त्यांनी मुंबईतील वातावरण बिघडवण्याचं काम केलं. त्यामुळे जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत शिवसैनिक घराबाहेरून हलणार नाहीत असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले. मातोश्री हे आमचं दैवत आहे, त्यामुळे त्याला आव्हान देणारी भाषा जर कोणी करत असेल तर शिवसैनिक शांत बसणार नाही असंही अनिल परब म्हणाले.


अनिल परब म्हणाले की, "राणा दाम्पत्याने दोन दिवस झाले प्रक्षोभक वक्तव्यं केली. त्यांच्याविरोधात आम्ही पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहोत. आम्हाला हिंदुत्व कोणीही शिकवू नये. ज्यांना कुणाला हनुमान चालिसा वाचायची आहे त्यांनी आपल्या घरामध्ये वाचावी. राणांनी माफी मागावी आणि विषय संपवावा."


दरम्यान, शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली असून राणा दाम्पत्यांनी माफी मागावी यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. 


गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेनेही त्याला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. त्यावर आज पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून राणा दाम्पत्याने हनुमान पठणाची भूमिका मागे घेतली. त्यानंतर आता शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली असून पेठे वाटण्याचा कार्यक्रमही सुरू आहे.