उस्मानाबाद: निवडणुकीमुळं महाराष्ट्राच कुरूक्षेत्र झालं आहे. कारण युती तुटल्यानंतर भाजपानं शिवसेनेला कौरवांची उपमा दिली. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातून भाजपवर जोरदार टीका सुरु झाली आहे. या सर्व घडामोडींवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या दोन्ही पक्षांना कौरव म्हणून संबोधलं आहे.


'शिवसेना-भाजप दोघेही कौरवच'

'आम्हीच पांडव आहोत हे दोन्ही पक्ष दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. पण हे दोघंही कौरवच आहेत. शिवसेना ही अजूनही सत्तेत आहे. निवडणुका आल्या की युती तोडायची. निवडणूक झाली की, पुन्हा कल्याण-डोंबिवलीसारखं एकत्र यायचं. महाराष्ट्रातील जनतेला फसवायचं, हा धंदा कौरवासारखा भाजप आणि शिवसेनेनं लावलेला आहे.' अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे.

'भाजप किंवा शिवसेना स्वत:ला पांडव म्हणत असले तरी ते दोघंही कौरव आहेत. हे सरकार आणि दोन्ही पक्ष भरकटलेले आहेत. हे भांडण नक्की कशासाठी चाललं आहे? महाराष्ट्राच्या विकासासाठी चाललेलं आहे का? नाही तर हे भांडण सत्तेच्या वाट्यासाठी आहे. म्हणून हे कौरव आहेत.' असं म्हणत दोन्ही पक्षांवर धनंजय मुंडेंनी तोंडसुख घेतलं.