बीड : शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे बीडच्या भाजपशी असलेले वैर त्यांच्या चांगलेच अंगलट येताना पाहायला मिळत आहे. विनायक मेंटेच्या शिवसंग्रामचे एकूण चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. आज त्या शिवसंग्रामकडे एकही जिल्हा परिषद सदस्य राहिलेला नाही. शिवसंग्रामचे एकुलते एक जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनीही पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


भाजपचा सहयोगी पक्ष असलेला शिवसंग्राम बीड जिल्ह्यात मात्र भाजपविरोधी म्हणून ओळखला जातो. अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामने भाजपविरोधी भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे तिकडे राज्यभर भाजपाचा सहयोगी पक्ष म्हणून घेणाऱ्या विनायक मेटे यांना मात्र बीडच्या भाजपशी जुळवून घेता आलेलं नाही. यामुळे इतर सहयोगी पक्षांना किमान एक मंत्रीपद मिळालं होतं मात्र विनायक मेटेंना मंत्रीपद मिळालं नाही.


भाजपच्या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा सत्कार स्वीकारल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक नाराज झाल्याचे चित्र समोर आलं होतं. एवढेच नाही तर या रथामध्ये विनायक मेटे मुख्यमंत्र्यांसमवेत भाषण करत होते, तर त्याच रथातून पंकजा मुंडे या उतरुन आपल्या स्वतःच्या गाडीतून सभास्थळी गेल्या होत्या.


शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के गळाला लागल्यानंतर यापूर्वीच शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपने आपल्या गोटात घेतले होते. आज पंकजा मुंडे यांच्या रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी शिवसंग्रामचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य देखील आज भाजपवासी झाले.


आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामने भाजपकडून 12 जागा मागितल्या होत्या. मात्र ज्या शिवसंग्रामकडे आज बीड जिल्ह्यात एकही जिल्हा परिषद सदस्य शिल्लक राहिला नाही, त्या शिवसंग्रामला भाजप किती जागा देते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.