बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक करणारे शिवसंग्रामचे युवा प्रदेश अध्यक्ष राजेंद्र मस्के यांना पक्षाने दणका दिला आहे. त्यांची विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
आठवडाभरापूर्वी राजेंद्र मस्के यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा एक कार्यक्रम घेतला होता, ज्यात स्पष्ट झालं होतं की राजेंद्र मस्के हे भाजपाशी जवळीक करत आहेत. एवढंच नाही, तर याच कार्यक्रमादरम्यान बीडचा भावी आमदार कोण, अशा प्रकारच्या घोषणासुद्धा राजेंद्र मस्के यांच्यासंदर्भात देण्यात आल्या होत्या.
एकीकडे शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील दुरावा वाढत आहे. तर दुसरीकडे राजेंद्र मस्के यांनी मात्र पंकजा मुंडे यांना विकासकामांच्या उद्घाटनाला बोलावून शक्ती प्रदर्शन केलं. याच कार्यक्रमामध्ये विनायक मेटे यांनी राजेंद्र मस्के हे शिवसंग्राम सोडून जाणार नाही, याची ग्वाही सुद्धा दिली.
विनायक मेंटेची ही ग्वाही औटघटकेची ठरली. त्याचं कारण म्हणजे नुकत्याच शिवसंग्राम पक्षाच्या पुण्याच्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये शिवसंग्राम युवा प्रदेशाध्यक्षपदी आहेर यांची नियुक्ती केली आणि राजेंद्र मस्के यांना या पदावरून कमी केलं.
आधी माजी मंत्री सुरेश धस यांना भाजपमध्ये घेऊन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशी असलेली जवळीकता हे पाहता पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे. त्यातच आता राजेंद्र मस्के यांच्या रूपाने पंकजा मुंडे यांच्या बेरजेच्या राजकारणाला आणखी बळकटी मिळाली आहे.
भाजपाशी जवळीक साधणाऱ्या शिवसंग्रामच्या युवा प्रदेशाध्यक्षांची पदावरुन हकालपट्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2018 07:53 PM (IST)
बीडमधील एका कार्यक्रमात बीडचा भावी आमदार कोण अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. राजेंद्र मस्केंची भाजपशी वाढलेली जवळीक पाहता शिवसंग्रामने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -