मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 349वा वर्धापनदिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत आणि पुण्यातील लाल महलामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 


रायगड दुमदुमला 


शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त मावळ्यांच्या वेशभूषेत किल्ले रायगडावर दाखल झाले होते. या सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर एकीकडे ढोलताशाचा गजर सुरू होता, तर दुसरीकडे गुलालाची उधळण करण्यात आली. या सोहळ्याला धनगर नृत्यानं तर आगळीच बहार आणली. छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी विधिवत पूजा करून शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन साजरा केला. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ अँड सन्सकडून सोन्याच्या खास 350 होनांची निर्मिती करण्यात आली होती. याच सोन्यांच्या होनांनी शिवरायांना अभिषेक करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. या शिवभक्तांनी केलेल्या शिवरायांच्या जयघोषानं अवघा रायगड दुमदुमून गेला होता.


कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच राज्याभिषेक सोहळा 


कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपतींसह राजघराण्यातील सदस्यांची उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी राजवाडाही सजला होता. 


कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीचा अभिषेक केला गेला. एकीकडे संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असताना इकडे नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. या शिवराज्याभिषेक सोहळ्याला कोल्हापुरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. झांजपथक, मिलिटरीचे बँड, पोलिसांचे बँड, शाहिरी पोवाडे यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आलं. 


पुण्यातील लाल महलामध्ये राज्याभिषेक सोहळा उत्साहात 


अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील लाल महालात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरद पवार म्हणाले की, आजचा दिवस महत्वाचा, 350 वर्षांपूर्वी महाराजांनी शिवराज्याभिषेक झाला. हे राज्य त्यांचे आहे. देशात अनेक राजे झाले, मोगल, यादव राजा अशोक यांचे राज्य देशात अनेक वर्ष चालले. मात्र शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांच राज्य नाही रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले.