पुणे : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली. यावेळी खासदार संभाजीराजे, पालकमंत्री गिरीश बापट, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यासह हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
शिवनेरी किल्ल्यावर दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच राज्यभरात देखील विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडत आहेत.
केवळ राज्यात आणि देशातच नव्हे, तर परदेशातही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील न्ययॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअकरला शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.
टाईम्स स्क्वेअर परिसर अक्षरशः ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा दणाणून गेला होता. न्यूयॉर्कमधील ‘छत्रपती फाऊंडेशन’ने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य आणि विचारांची ओळख व्हावी, म्हणून ‘छत्रपती फाऊंडेशन’कडून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी जगातील एकूण 45 देशांमध्ये शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. अमेरिकेसह जर्मनी, इंग्लंड, रशिया, चीन, जपान, दक्षिण आफ्रिकेसह अनेक युरोपीय-आशियाई देशांचा यामध्ये समावेश आहे.