पुणे : राष्ट्रवादीतून भाजप आणि शिवसेनेत होत असलेल्या आऊटगोईंगवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार ईडी, सीबीआय सारख्या एजन्सींचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीची सत्ताधारी पक्षाने एसीबी चौकशी लावली आहे. त्यामुळे त्यांनी भीतीपोटी राजीनामा दिल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. याशिवाय शिवेंद्रराजे, संग्राम जगताप, दिलीप सोपल आदी नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु आहेत. मात्र हे नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं.


शिवेंद्रराजे काल मला भेटले आणि त्यांनी पक्ष सोडून जाणार नसल्याचं सांगितलं आहे. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा आम्ही पक्षासोबत असल्याचं सांगितलं आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल काल माझ्यासोबतच होते. तर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेही कुठे जाणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं.


राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. लोकशाहीला आघात करण्याचा हा प्रकार आहे, असा घणाघात शरद पवारांनी केला.


पंढरपूरमधील कल्याण काळे यांचा साखर कारखाना अडचणीत होता. राज्य सरकारने नियम सोडून 30-35 कोटी रुपये दिले. मात्र त्यांना पक्षांतर करण्याची अट घातली. त्यावेळी त्यांना संस्था टीकवायची होती म्हणून त्यांनी पक्षांतर केलं. तसेच पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा बँकेचे कर्ज आहे. त्यांना सरकारने आर्थिक मदत केली आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यास भाग पाडले. त्यांची इच्छा असो अथवा नसो त्यांच्या कुटुंबियांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली, असा आरोप शरद पवारांनी केला.


राजकारणात हे चित्र यापूर्वी महाराष्ट्रात नव्हतं. दबाव आणि सुडाचे राजकारण केलं जात आहे. यासर्व गोष्टींचा निषेध करतो आणि या गोष्टीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. मला हे काही नवीन नाही. अशावेळी नव्या पिढीला सोबत घेऊन काम करायचे असते, असं शरद पवारांनी सांगितलं.



संबंधित बातम्या