कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणाचा नवा पॅटर्न सुरु झाला आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.


कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असं कधीही पाहायला मिळालं नाही. पण ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच घरी जाऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेण्याच्या एका परंपरेचा पायंडा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पडला आहे.



'आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरु', कवितेच्या माध्यमातून राजू शेट्टींनी व्यक्त केल्या भावना

आईने काय आशीर्वाद दिला?

खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींसोबत संवाद साधल्यानंतर त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. "मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहू दे, असं धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्या आईला म्हणाले.




यावर "माझा आशीर्वाद लय मोठा आहे. माझा लेक सर्वांना धरुन आहे, तसं तुम्हीही लोकांना धरुन राहा," असा आशीवार्द राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.





राजू शेट्टी यांचा पराभव

अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा सुमारे 96 हजार मतांनी पराभव केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना 582060 मतं मिळाली तर राजू शेट्टी यांना 486042 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद यांना 122646 इतकी मतं मिळाली.

गेल्या अनेक महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सर्वांनी अनुभवला. या दरम्यान नेत्यांमध्ये झालेले अनेक वाद-विवाद, टीका-प्रतिटीका आणि टोकाची ईर्षाही पाहायला मिळाली. पण धैर्यशील माने यांनी आज चक्क राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या कृत्याने कोल्हापूरमध्ये राजकारणाचा नवा पॅटर्न सुरु झाल्याचं दिसत आहे.