कोल्हापूर : शिवसेना सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही, असे भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनावरही जोरदार टीका केली. ते कोल्हापुरात बोलत होते.


रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने स्वत:चे हसं करुन घेतले आहे. घरातील भांडणं रस्त्यावर काढण्याची वृत्ती चुकीची असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. शिवाय, शिवसेना सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेत स्वत:चे नुकसान करुन घेत आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेने मुंबई आणि ठाण्यात महागाईच्या मुद्द्यावरुन भाजपविरोधात आंदोलन केले होते. मुंबईत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर शिवसेनेने अत्यंत तिखट टीका केली होती. दुसरीकडे, शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र, काल मराठवाड्यातील शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंना भेटून सत्तेतून बाहेर न पडण्याची विनंती केली. त्यावेळी, अद्याप सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील आमदारांना सांगितले.