लातूर: 17 किलोमीटरचं अंतर आणि फक्त 9 मिनिटात पार ही कोणतीही रेसिंगची स्पर्धा नव्हती. तर तिघांना जीवदान देण्यासाठीची धडपड होती.

लातूरमध्ये ब्रेन डेड झालेल्या 19 वर्षीय किरण लोभेचे अवयव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून विमानतळावर नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. यावेळी लातूरकरांनीही संयमाची प्रचिती देत या जगण्याच्या संघर्षाला हातभार लावला.

पोलिसांचा चोख बंदोबस्त, डॉक्टरांची तत्परता, अँब्युलन्स चालकाचा वेग आणि लातूरकरांचा संयम, यामुळे किरणचं दातृत्व फळाला आलं आणि मुंबई, हैदराबाद आणि औरंगाबादमधल्या तीन रुग्णांचे प्राण वाचले.

किरणला वीजेचा शॉक लागला होता. त्यामुळे त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सोमवारी संध्याकाळपासून त्याचा मेंदू काम करणं बंद झालं.

त्यानंतर कुटुंबाने अशा परिस्थितीत किरणचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.



कुटुंबाच्या धीरोदत्तपणाच्या या निर्णयानंतर लातूरमधील डॉक्टर कामाला लागले. त्यांनी मुंबईतील डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर हालचालींना वेग आला.

किरणचे हृदय, किडनी, यकृत (लिव्हर) हे अवयव गरजू रुग्णाला वेळेत देण्यासाठी लातूर विमानतळावर विमाने उभी होती.

लातूर विमानतळ ते सरकारी दवाखाना हा रस्ता अवयव घेऊन जाणाऱ्या गाडीसाठी मोकळा करण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या मदतीने करण्यात आले आहे.

लातूरकरांनी स्वत:हून रस्त्यातील गर्दी बाजूला करत वाहनांना विमानतळाकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. 17 किमी अंतर अवघ्या 9 मिनिटात पार करुन अॅम्ब्युलन्स विमानतळावर आली. त्यानंतर वायू वेगाने विमानांनी किरणचे अवयव घेऊन उड्डाण केलं.