सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यात नुकसान पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पण साताऱ्यातील काटेवाडीत उद्धव ठाकरेंचं एक वेगळं आणि हळवं रुपही पाहायला मिळालं. आपल्या घरी येण्याचा एका शेतकऱ्याच्या मुलीचा हट्ट उद्धव ठाकरेंनी पुरवला.

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत असताना एका शेतकऱ्याची लेक गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरेंजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. "मला साहेबांना भेटायचं आहे, मला साहेबांना भेटायचंच आहे," असं म्हणत ती गाडी जवळ गेली. मात्र ठाकरेंचे सुरक्षारक्षक तिला पुढे जाऊ देत नव्हते. अनेकांनी तिला पुढे न जाण्याचा सल्ला दिला. मात्र मला चेंगरु दे, पण मला साहेबांना भेटायचंच आहे, असा धोशा सुरुच ठेवला. मुलीची धडपड पाहून उद्धव ठाकरेंनी तिला बोलावून काय पाहिजे असं विचारलं. त्यावर तिने काहीही करा आणि माझ्या घरी चला असं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी तिची समजूत घालत नंतर येईन म्हटलं. परंतु मुलीचा हट्ट कायम होता. "मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्ही घरी चला," असं ती वारंवार बोलत होती. अखेर मुलीची धडपड पाहून उद्धव ठाकरेंनी तिचं मन मोडलं नाही.

Uddhav Thackeray | अखेर बळीराजाच्या मुलीचा हट्ट उद्धव ठाकरेंनी पुरवला | ABP Majha



आपल्याच गाडीत कांचनला बसवत उद्धव यांनी थेट तिचं घर गाठलं. कांचनच्या घरी झालेलं स्वागत उद्धव यांना आयुष्यभर लक्षात राहिल असंच होतं. कांचनच्या घरच्यांनी केलेलं औक्षण पाहून स्वत: ठाकरेही भारावले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या घरी आल्यावर कांचनच्या कुटुंबियांनाही आनंदाचं भरतं आलं. मग सुरु झालं फोटोसेशन. उद्धव ठाकरेंसोबत फोटो काढण्यासाठी एकच धडपड सुरु झाली. उद्धव यांनीही सर्वांसोबत फोटो काढले. यावेळी घरातील व्यक्तींनी उद्धव यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवलं.

शेवटी कांचनचा आणि तिच्या कुटुंबीयांचा निरोप घेऊन उद्धव ठाकरे पुढच्या दौऱ्याला निघाले. राजकीय व्यासपीठावरुन विरोधकांवर शाब्दिक बाण सोडणारे, आपल्या कणखर भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेल्या उद्धव ठाकरेंनी साताऱ्यात एका लेकीचा हट्ट बापाच्या मायेने पुरवला.