मुंबई: गेल्यावेळी म्हणाले होते की मोदींचा फोटो लावल्याने शिवसेनेचे खासदार निवडून आले, आता आम्ही मोदींचा फोटो काढला आणि आमचे 31 खासदार निवडून आले, पण भाजपच्या आहे त्या जागा कमी होऊन 7 वर आल्या असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी लगावला. गेल्या वेळी भाजपचे 23 उमेदवार होते, आता महायुतीचे एकूण खासदार 17 आले असल्याचंही ते म्हणाले. विरोधकांच्या 48 उमेदवारांच्या बॅनरनवर बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आला होता, पण ठाकरे सोबत नसल्याने त्यांना अपयश आल्याचा टोलाही भास्कर जाधवांनी लगावला. शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्तच्या कार्यक्रमात (Shivsena Vardhapan Din) ते बोलत होते.


भास्कर जाधव म्हणाले की, भाजप म्हणालं 400 पार, जो सरकार विरोधात जाईल त्याच्यावर शासकीय यंत्रणेचा दबाव टाकला जात होता. त्यात महाराष्ट्रातून एक आवाज येत होता, इस बार 400 पार नाही तडी पार. तुम तडीपार हा शब्द देशभरात घुमला.


आम्ही मोदींचे फोटो काढले, पण त्यांनी बाळासाहेबांचे फोटो लावले


भास्कर जाधवांनी शिवसेना ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, कोण कोणाचा स्ट्राईक रेट सांगताय? तुम्ही 45 + सांगत होता. पण उद्धव ठाकरे यांनी सर्व मतदारसंघ ढवळून काढले. भाजप सेनेसोबत होता तेव्हा त्यांचे 23 खासदार निवडून आले होते. आता तुमचे किती निवडून आले? ते म्हणत होते तुम्ही मोदींचे फोटो लावून निवडून आलात. आम्ही मोदींचे फोटो काढले, पण त्यांच्या 48 च्या 48 उमेदवाराच्या फोटोवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. 


आमचा स्ट्राईक रेट 200 टक्क्यांचा


भास्कर जाधव म्हणाले की, तुमचे 23 होते आता सगळे मिळून 17 आले आणि आम्ही 31 निवडून आणले. शिवसेनेचे 13 खासदार यांनी फोडले, आता त्यांचे 7 झाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत 5 खासदार होते, आता त्याचे 9 झाले. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट हा 200 टक्के आहे. 


गेल्या 58 वर्षांत जे जे अंगावर आले त्यांना आपण शिंगावर घेतलं. ज्याला ज्याला आपण मोठं केलं त्याला नंतर मस्ती आली तर त्याला त्याची जागाही दाखवली. आजच्या दिवशी आपण निर्धार करू मी माझी शिवसेना मोठी करेन असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलं.