Mahayuti Seat Sharing In Maharashtra : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शिवसेना शिंदे गटातील पाठिंबा दिलेल्या 13 खासदारांना पुन्हा संधी मिळणार की नाही याची चर्चा सुरू होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या खासदारांसाठी मोठी ताकद लावत तेरापैकी आठ खासदारांना तिकिट दिलं आहे. मात्र आता तिकिट दिलेल्या ठिकाणी उमेदवार बदलाची चर्चा  रंगल्याने शिंदे गटामध्ये सपशेल नाराजी पसरली आहे. भाजप मित्र पक्षांना संपवत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटातून करण्यात येत आहे. 


भाजप सर्व्हेच्या नावावर शिंदे साहेबांना फसवत असल्याचा आरोप


माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजप सर्व्हेच्या नावावर शिंदे साहेबांना फसवत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की एकनाथ शिंदे भाजप समोर झुकणार नाहीत. उमेदवार देण्यावरून भाजप शिंदेंवर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, अशा दबावाला शिंदे साहेब जुमानत नाहीत असे ते म्हणाले. उमेदवार बदलले गेल्यास आम्ही आमची नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करणार असल्याचेही सुरेश नवले म्हणाले. 


हातकणंगले आणि हिंगोलीमध्ये उमेदवार बदलणार असल्याची चर्चा


दरम्यान हातकणंगले आणि हिंगोलीमध्ये उमेदवार बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे. या दोन्ही उमेदवारांना भाजपकडून कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे या दोन ठिकाणचे उमेदवार बदलणार का? अशी चर्चा रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भूवया उंचावल्या आहेत. महायुतीमध्ये अजूनही चार ते पाच जागांवर घमासान सुरुच आहे. कल्याण, ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेंचा त्यामध्ये समावेश आहे. 


कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार असूनही त्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलेले नाही. त्यामुळे कल्याणच्या बदल्यात ठाणे किंवा ठाण्याच्या बदल्यात कल्याण अशी चर्चा महायुतीमध्ये सुरु आहे. भाजप दोन्हीपैकी एका जागेसाठी आग्रही आहे. दुसरीकडे, ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने ते कोणत्याही परिस्थितीतून मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाहीत. मात्र भाजपकडून ठाण्यावर दावा करण्यात आला आहे. 


दुसरीकडे कोकणातील एकमेव सीट ज्या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकते, पण तिथे सुद्धा भाजपने दावा केला आहे. जर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघाची शिंदे गटाला जागा मिळाली नसल्यास ज्या कोकणातून शिवसेनेला बळ प्राप्त झालं त्या ठिकाणी एकही त्यांचा उमेदवार नसेल अशी स्थिती आहे. त्यामुळे या जागेवरून सुद्धा वाद सुरु आहे. याठिकाणी नारायण राणे यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू आहेत, तर दुसरीकडे किरण सामंत निवडणुकीत शिंदे गटाकडून इच्छुक आहेत. त्यामुळे आता सरशी कोणाची होणार याकडे लक्ष आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या