Mla Devendra bhuyar : सध्या राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी पाऊस झालाय, त्या ठिकाणी शेतकरी खरीपाची पेरणी करत आहेत. दरम्यान, मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Mla Devendra bhuyar) हे आपल्या शेतात पेरणीसाठी जमिनीची मशागत  करत असल्याचे दिसून आले. देवेंद्र भुयार यांनी थेट शेतात जात सारे फाडण्याकरता औत हाती घेतल्याचे दिसले. यावेळी त्यांनी पहिली शेती, नंतर समाजकारण, राजकारण अशी आमची सामाजिक जीवनातील व्याख्या असल्याचं सांगितलं. 




 
वरुणराजाला साक्षी ठेवून आम्ही पेरणी करतोय


दरम्यान, एकीकडं महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत विविध पक्षाचे आमदार मुंबई किंवा बाहेरच्या राज्यात असताना दुसीरकडे आमदार देवेंद्र भुयार यांनी आपल्या शेतात औत धरल्याचे दिसले. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. पावासाच्या प्रतिक्षेनंतर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याची भुयार म्हणाले. महाराष्ट्राची भूमी ही पवित्र भूमी आहे. पहिली शेती, नंतर समाजकारण राजकारण अशी आमची सामाजिक जीवनातील व्याख्या असल्याचं भुयार यांनी यावेळी सांगितलं. शेती ही फार महत्वाची आहे. शेतीत राबणं खूप गरजेचं असल्याचे भूयार म्हणाले. मी शेतकरी असल्यामुळं सालाबाद प्रमाणं शेतात राबतो. त्यामुळं याहीवर्षी मी शेतात पेरणी करत असल्याचं भुयार यांनी सांगितलं. यावर्षी देखील शेतकऱ्याच्या घरात भरभराटीचं पीक यावं यासाठी वरुणराजाला साक्षी ठेवून आम्ही पेरणी करत असल्याची माहिती भुयार यांनी दिली.


राज्याच्या काही भागात चांगला पाऊस


राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, राज्यातील इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, मुंबई आणि उपनगरासह अहमदनगर, यवतमाळ, रायगड, औरंगाबाद या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जरी पाऊस झाला असला तरीसुद्धा शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्‍यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये असे मत कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून  व्यक्त करण्यात आलं आहे. 




राज्यसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र भुयार चर्तेत


राज्यसभेच्या निवडणुकीनंतर देवंद्र भुयार हे चर्चेत आले होते. कारण राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर भुयार यांची जोरदार महाराष्ट्रात चर्चा झाली होती. दरम्यान, भुयार यांनी राऊतांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.  


महत्वाच्या बातम्या: