मुंबई माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या या घोषणेचे कोकणातील राजकारणात पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनीदेखील या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकारणात खूप घाणेरड्या पद्धतीने कुरघोडी केली जात असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.  


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. राऊत यांचा पराभव केल्याशिवाय आपण दाढी करणार नसल्याची प्रतिज्ञादेखील निलेश राणे यांनी 2019 च्या निवडणुकीपूर्वी केली होती. निलेश राणे यांच्या राजकीय निवृत्तीच्या घोषणेनंतर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, निलेश राणे राजकारणातून निवृत्त का झाले यावर मी स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. प्रत्येकाला राजकारणात कधी जायचं आणि कधी माघार घ्यायची हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. राजकारणात खूप घाणेरड्या पद्धतीने कुरघोडी केली जात आहे. कदाचित याच राजकीय कुरघोड्यांमुळेच त्यांना नैराश्य आलं असेल, असे सूचक वक्तव्य खासदार राऊत यांनी केले. माझ्या माहितीनुसार निलेश राणे हे लोकसभा उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक नव्हते, असेही त्यांनी म्हटले. 


उद्धव ठाकरेंनी मला पुन्हा एकदा उमेदवारी या लोकसभा मतदारसंघातून दिली तर अधिकाधिक मताधिक्याने माझा विजय कसा होईल याचा विचार मी करेल, असेही राऊत यांनी म्हटले. शिवसेना फुटीचा परिणाम जाणवणार नाही या लोकसभा मतदारसंघातून सव्वादोन लाखांनी आमचा उमेदवार जिंकून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


निलेश राणेंनी नेमकं काय म्हटले?


निलेश राणे म्हणाले,  मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19-20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.  


मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.