Nitin Deshmukh On Eknath Shinde: उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना आज एसीबीकडून नोटीस आली आहे. 17 जानेवारी रोजी चौकशीसाठी 17 जानेवारी रोजी अमरावती येथील कार्यालायत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तक्रारदाराच्या फोन संभाषणाची क्लिप असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नितीन देशमुख यांच्या आरोपावर शिंदे गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.  


एसीबीची नोटीस आल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, 'आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भावना गवळी यांच्या तक्रारीनंतर एसीबीच्या तक्रारीत अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.' आपल्यासंदर्भातील एसीबीकडे तक्रार करणारा व्यक्ती आणि मुख्यमंत्र्यांच्या फोन संभाषणाची ऑडीयो क्लीप आपल्याकडे असल्याचा खळबळजनक दावा आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तक्रारदाराची ओळख उघड झाल्यास पुरावे उघड करणार असल्याचेही आमदार नितीन देशमुख यांनी सांगितलं. आमदार नितीन देशमुखांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी 17 जानेवारीला एसीबीच्या विभागीय कार्यालयात हजर होण्याचे समन्स पाठवण्यात आला आहे.  


तक्रारकर्ता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप माझ्याकडं आली आहे. एसीबीला तक्रारदार संदर्भात माहिती मागितली असून तक्रारदार तोच आहे असे निष्पन्न झाल्यास मुख्यमंत्री अन् त्या व्यक्तीची ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर ठेवल्या जातील, असेही देशमुख म्हणाले. आतापर्यंत नागपूर पोलिसांसह अकोला लोहमार्ग पोलीस आता एसीबी कडून नोटीस प्राप्त झाली असून हे सर्व माझ्याविरुद्ध षडयंत्र रचल्या जात असल्याचे ते म्हणाले. 17 तारखेला मी अमरावतीमधील कार्यालयात हजर राहणार आहे, असे नितीन देशमुख यांनी सांगितलं.


17 जानेवारी रोजी मी चौकशीसाठी हजर राहणार आहे. पण तक्रार देणाऱ्याचं नोटीसमध्ये नाव नाही. एखाद्या आमदाराला नोटीस पाठवयला कुणाची तक्रार आहे, त्याचा उल्लेख असायला हवा. पण नोटीसमध्ये तसा उल्लेख नाही. माझ्याकडे कोणती संपत्ती अवैध आहे, त्याचाही उल्लेख नाही. 17 तारखेला अमरावतीमध्ये रितसर पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल, असे देशमुख म्हणाले.... तक्रारकर्त्याच्या नाव न सांगण्याच्या अटीवर मला नोटीस पाठवण्यात आली आहे. तक्रारकर्त्याचं नाव समोर आल्यानंतर सत्य समोर येईल. त्याला कुणी तक्रार द्यायला लावलं, हे समजेल... 17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल, असेही देशमुख म्हणाले. 


एसीबीच्या रडारावर असणारे ठाकरे गटाचे आमदार -
राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि आता बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे.  17 तारखेला नितीन देशमुख अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहेत.