मु्ंबई :  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Shiv Sena MLA Disqualification case) विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या सुनावणीबाबत  नवी अपडेट समोर आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सुनावणी बाबतचे नवीन वेळापत्रक जारी केले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार, शिंदे गटाच्या नेत्यांचीही (Shiv Sena Shinde Group) उलटतपासणी ठाकरे गटाचे वकील करणार आहेत. 


सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात सुनावणी आटोपताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना ओव्हर टाईम करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीतील साक्ष नोंदवणे, उलट तपासणीतील संथगतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वेळापत्रक जारी केले होते. आता, त्यात विधानसभा अध्यक्षांनी पुढील महिन्याबाबतचे वेळापत्रक जारी केले आहे. या वेळापत्रकानुसार, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 


>> सुनावणीचे पुढील वेळापत्रक


> 30 नोव्हेंबर पर्यत ठाकरे गटाची उलट तपासणी पूर्ण होणार


> 1, 2,7,8 डिसेंबर या तारखेदरम्यान  शिंदे गटाची उलट तपासणी होणार


> 11 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी


> 11,12,13,14, 15, 18, 19,20 डिसेंबर दरम्यान  अंतिम सुनावणी


> 21 आणि 22 डिसेंबर अधिकचे दोन दिवस दिले जाणार



शिंदे गटाच्या कोणत्या आमदारांची होणार उलट तपासणी (cross examination of Eknath Shinde Shiv Sena)


आमदार सुनील प्रभू आणि कार्यालय सचिव विजय जोशी यांची उद्या, 30 नोव्हेंबर रोजी उलट साक्ष घेतली जाणार आहे. तर 1 डिसेंबरपासून शिंदे गटाच्या नेत्यांची उलट साक्ष घेतली जाणार आहे. शिंदे गटातील पाच आमदार आणि एक खासदारांची उलट साक्ष होणार आहे.  आमदार भरतशेठ गोगावले, दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम, दिलीप लांडे आणि खासदार राहुल शेवाळे यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे.  


सुप्रीम कोर्टाची डेडलाईन (Supreme Court on Maharashtra politics)


आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. याप्रकरणी 30 ऑक्टोबरला  सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी पार पडली. त्यावेळीही सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वेळापत्रक फेटाळलं होतं.इतकंच नाही तर अत्यंत कठोर शब्दांत राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयालयानं   नाराजी व्यक्त केली. तसेच,  सर्वोच्च न्यायालयानं  31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत.