Shiv Sena MLA Disqualification Case Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळात शिवसेना आमदार अपात्रेचा (Maharashtra Disqualification Case) निकाल देणार आहेत. या निकालानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळी दिशा मिळेल.  एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाच्या बाजूने निकाल लागणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र केले तर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी राज्यातील सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही सांगितलं जातेय. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर भाजपचा प्लॅनही तयार असल्याचं बोललं जातेय. 


BJP चा प्लॅन बी काय ?


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळावारी माध्यमांशी बोलताना आमचं सरकार स्थिर राहील, असं सांगितलं होतं. आमची युती कायदेशीर असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षांचा निकाल आमच्या बाजूने लागेल, असेही फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल आला तरी भाजपकडे प्लॅन बी तयार असल्याचं फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन दिसतेय. 


शिवसेनेत बंड कधी ?


20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला. 40 आमदारांना सोबत घेत त्यांनी सूरतमार्गे गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री झाले. हे सर्व सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टानं 10 जानेवारीपर्यंत या प्रकरणाचा निर्णय देण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांना दिले. आज ही मुदत संपुष्टात आली आहे. राहुल नार्वेकर थोड्याच वेळात आमदार अपात्रेवर निर्णय देणार आहेत. 


निकाल विरोधात लागला तर द्यावा लागणार राजीनामा -


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे यांच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली. त्यावर तज्ज्ञांसोबत चर्चाही केली. अपात्रताबाबत थोड्याच वेळात निकाल येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व मंत्र्यांना तात्काळ राजीनामा द्यावा लागेल. राहुल नार्वेकरांनी शिंदेंच्या विरोधात निकाल दिला तर तांत्रिकदृष्ट्या सामना करावा लागेल. 


भाजपकडे बहुमत - 


एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राज्यात महायुती नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु होतील. भाजपकडे बहुमत असल्यामुळे पुन्हा ते सरकार स्थापन करतील. कारण, गेल्यावर्षी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांना सोबत घेत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार आहेत. महाराष्ट्र विधानसभामध्ये 288 जागा आहेत, बहुमतासाठी 145 आमदारांचं समर्थन गरजेचं आहे. 2019 मध्ये भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या. अजित पवार गट, भाजप आणि अपक्ष असं सरकार स्थापन करु शकतात. 


मुख्यमंत्री कोण होणार ?


एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. पण मुख्यमंत्री नवे असतील. अशा स्थितीत अजित पवार गटाकडून दावा केला जाऊ शकतो. अजित पवार यांच्याकडे राज्याची सुत्रे दिली जाऊ शकतात. राज्य सरकारकडे काही महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर तशा चर्चाही होत्या.