Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) खरा निकाल लागलाच नसून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी दिली. आधीच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उरलेली औपचारिकता आज पूर्ण झाली असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले. 


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. त्यांनी आपल्या निकालात शिवसेना ही शिंदे यांच्या नेतृत्वातील असल्याचा निर्वाळा दिला. तर, दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील कोणत्याही आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली नाही. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 


प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उद्धव  ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 


आजच्या निकालाने औपचारिकता पूर्ण


त्यांनी पुढे म्हटले की, ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना( UBT) यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. असे त्यांनी म्हटले आहे.


या प्रवृत्तींविरोधात एकत्र लढू 


निकाल काहीही लागला असला, तरी ह्या प्रवृत्तीविषयी आपण मिळून लढू असं देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत अजून निर्णय झाला नसल्याने वंचित आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा निर्णय झाला नसल्याची माहिती वंचितकडून देण्यात आली होती. 


सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले, ठाकरेंची टीका


आजच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसवण्यात आलं ते आता समोर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात, एक परिमान असते. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले. त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचं दाखवून दिलं. शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या :