मुंबई : विधानसभा अध्यक्षांना इतिहास रचण्याची संधी मिळाली होती. पण त्यांनी ती संधी गमावली असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिलीये. आजचा निकाल हा कोणताही निर्णय नाही, हे षडयंत्र आहे. ज्या व्यक्तीने हा निर्णय दिला त्या व्यक्तीने देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसलाय, असं म्हणत राऊतांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला. शिवसेनेच्या आमदार अपात्रेतवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. यावेळी त्यांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवत, खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं म्हटलं. त्यांच्या याच निर्णयावर संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
ज्या शिवसनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली, ती शिवसनेचा कोणाची हा निर्णय भाजपची व्यक्ती घेणार का असा सवाल देखील राऊतांनी यावेळी उपस्थित केलाय. जे आज जल्लोष करतायत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनची अशी अवस्था करणं हे अत्यंत अघोरी कृत्य आहे. तुम्ही शिवसनेला कधीही मागे खेचू शकणार नाही, शिवसेना नव्याने उभी राहतेय, असं राऊतांनी म्हटलं.
आम्ही न्यायालयात जाऊ - संजय राऊत
निवडणूक घ्या, खरी शिवसेना कोणाची हे कळेल. ज्यांनी गद्दारी केली, महाराष्ट्रद्रोह्यांना अपात्र ठरवणं हाच खरा निर्णय होता. राम हा सत्यवचनी होते, त्यामुळे रामाचं नाव घेण्याचं त्यांना अधिकार नाही. ज्या शिवसेनेनं तुम्हाला सगळं दिलं, त्या शिवसेने वनवासात तुम्ही पाठवलं. यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असं राऊतांनी म्हटलं.
कोण विधानसभा अध्यक्ष - संजय राऊत
कोण एकनाथ शिंदे, कोण भरत गोगावले, कोण एकनाथ शिंदे त्यांची लायकी काय अशा शब्दांत संजय राऊतांनी घणाघात केलाय. विधानसभा अध्यक्षच बेकायदेशीर असल्याचं राऊतांनी यावेळी म्हटलं. घटना कोणाची वैध हे ठरवणारे विधानसभा अध्यक्ष कोण, असं म्हणत राऊत कडाडले.
शिवसेनेला संपवणं हे महाराष्ट्र संपवण्याचं काम - संजय राऊत
शिवसेनाला संपवणं म्हणजे महाराष्ट्राला संपवण्यासारखं आहे. हे काम एका मराठी माणसाने म्हणजेच राहुल नार्वेकरांनी केलंय. एकनाथ शिंदे यांना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्री पद तुम्हाला लखलाभ, पण तुम्ही केलेलं पाप हा अवघा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं.
एकमेव पक्ष राहावा याची सुरुवात - संजय राऊत
देशाची प्रादेशिकता संपवून देशात एकच पक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून झालीये, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. पण आमचा कायदेशीर लढा हा सुरुच राहिल. आम्हाला हा निर्णय मान्य नाही, अशी प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.