MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आमदार अपात्रता संबंधी 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, आता त्याआधीच निकाल समोर येण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांना उद्यापर्यंत साक्ष पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 


मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाकडून दोन्ही बाजूने साक्षीदारांची उलट तपासणी सुरू आहे. त्यानुसार ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आजच्या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्षांनी उद्यापर्यंत उलट तपासणी साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता शिवसेना आमदार अपात्रता निकाल हा वेळेआधीच जाहीर होण्याची शक्यता आहे. 


कसे आहे वेळापत्रक


उद्यापर्यंत (12 डिसेंबर) उलट साक्ष संपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या वकिलांना निर्देश दिलेत. त्यानुसार, आता उद्या, 12 डिसेंबर रोजी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष होणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने 13 ते 15 डिसेंबर दरम्यान लेखी युक्तिवाद होणार आहे. लेखी युक्तिवादानंतर 16 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होणार आहे. अखेर 20 डिसेंबरनंतर शिवसेना आमदार अपात्रता निकाल सुनावण्यात येणार आहे. 


सुनील प्रभूंची नाराजी 


विधानसभा अध्यक्षांनी जारी केलेल्या निर्देशावर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे गटाच्या आमदारांना वेगळा न्याय आणि शिंदे गटाच्या आमदारांना वेगळा न्याय असे चालणार नाही, असे प्रभू यांनी म्हटले. माझी सहा दिवस उलट तपासणी झाली. इथे 3 दिवसांच 5 ते 6 लोकांची चौकशी संपवा असे निर्देश मिळत असतील तर हे बरोबर नसल्याचे त्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सुनावणी वेळेत संपवा अशी मागणी आहे असेही त्यांनी सांगितले. 


व्हीपचा मुद्दा कळीचा ठरणार?


शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनीस प्रभू यांची उलट तपासणी शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी घेतली. त्यावेळी अॅड. जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना व्हीपच्या मुद्यावर घेरले. प्रभू यांनी व्हीप जारीच केला नाही हे ठरवण्याच्या अनुषंगाने प्रश्न केले. जेठमलानी यांच्या प्रश्नांवर प्रभू यांनीदेखील जोरदार पलटवार केला. अॅड. जेठमलानी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विधीमंडळ कार्यालयीन सचिव  विजय जोशी यांचीदेखील साक्ष नोंदवली. तर, ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी केली. अॅड. कामत यांच्या उलट तपासणीत शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीप मिळाला नसल्याचे म्हटले होते.