MLA Disqualification Case : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेली चौकट मोडून विधानसभा अध्यक्षांनी (Maharashtra Assembly Speaker) आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) निकाल दिला असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने कोर्टही गंभीर दखल घेईल असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर वकिलांसोबत चर्चा करून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निकाल देताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला. तर, भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड वैध ठरवली. तर, कोणतेही आमदार अपात्र ठरवले नाहीत. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात या निकालाचे पडसाद उमटत असून चर्चा सुरू आहेत.
दिल्लीत माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने एक निकालपत्र दिलं होते. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेचं प्रकरण एक चौकट घालून अध्यक्षांना दिलं होतं. मात्र, ही चौकट पायदळी तुडवली गेली आहे. घटना घडली त्या दिवशी पक्ष कुठला आहे, हे तपासून घ्या अस सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जर करण्यात आलं असतं तर त्यांचे आमदार अपात्र ठरले असते. लवकरच हे प्रकरण सुप्रीम कोर्टात येईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल म्हणून कोर्ट याची दखल घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अनिल परब यांनी म्हटले की, कोणत्याही आमदाराला अपात्र न केल्यामुळे कोर्ट हे प्रकरण गांभीर्याने घेणार नाही, असे त्यांना वाटलं असेल. पण कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे कोर्ट याची गांभीर्याने दखल घेईल असेही त्यांनी म्हटले. लवाद हा कोर्टापेक्षा मोठा नसतो असेही त्यांनी म्हटले.
भाजपकडून रडीचा डाव
भाजपकडून रडीचा डाव सुरू असल्याची टीका त्यांनी केली. आता पक्षाला निवडणूक चिन्ह मिळू नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह आहे. त्यावर समता पक्षाने पुन्हा एकदा दावा केला आहे. भाजपच्या कटकारस्थानाविरोधात आम्ही कायम संघर्ष करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
निकालावरून पक्षात धुसफूस?
आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) मोठा झटका बसल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटामध्ये आता धुसफूस सुरु झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2018 ला पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का नाही यावरून पक्षात खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे सवाल उपस्थित केले असल्याचे वृत्त होते. त्याबाबत बोलताना अनिल परब यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही एकत्रितपणे संघर्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले.