मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केलं. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरे गटाने विधानसभा निहाय बैठका घेतल्या असून, विभागप्रमुखांचीही बैठक सेना भवन येथे बोलावण्यात आली होती. यावेळी उध्दव ठाकरेंनी पक्षातील सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर दोन व्यापाऱ्यांना आणि भाजपला मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आहे, उद्धव ठाकरे आणि आपल्या पक्षाला संपवून त्यांना महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे पण त्याच्यामध्ये आपण आहोत. मुंबई आपली आई आहे ती विकू देऊ नका. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 105 हुतात्मानी रक्त सांडलं, तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली. ती मुंबई व्यापाऱ्यांच्या हातात जाऊ द्यायची नाही, असं म्हणत मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना उध्दव ठाकरेंनी दिल्या आहेत. 

दोन व्यापाऱ्यांच्या हातात मुंबई महानगरपालिका द्यायची नाही. त्यासाठी आतापासून काम करा, विधानसभेत जे झालं ते महानगरपालिकेत होऊ द्यायचं नाही. माझा विरोध हा गुजरात्यांना नाही, तर जे दोन व्यापारी केंद्रात बसून महानगरपालिका घ्यायचं बघतायत त्यांना माझा विरोध आहे. सत्ताधारी प्रचंड पैसा वाटत आहेत, काहीजण पैशांसाठी जात आहेत. पण माझी भूमिका ठाम आहे. मी पण पैसे घेऊन गेलो असतो पण मी यांच्याविरोधात लढायचं ठरवलं आहे, या लोकांना मुंबईला संपवायचं आहे. ते आपण होऊ द्यायचं नाही, असंही पुढे उध्दव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

ठाकरेंच्या बैठकितले महत्वाचे मुद्दे

7 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. पुनःश्च एकदा मुंबई महानगरपालिकेवर आपला भगवा फडकविण्याच्या इर्षेने आपण कामाला लागायचे आहे. त्यासाठी संघटना बांधणी अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक शाखेतील शाखाप्रमुख ते गटप्रमुख आणि पोलिंग एजंट पर्यंतची कार्यकारिणी सदृढ, कार्यक्षम आणि अभ्यासू असणे आवश्यक आहे.

मतदार यादीचे परिपूर्ण वाचन प्रत्येक गटप्रमुखाने आणि त्या यादीच्या पोलिंग एजंटने आतापासूनच करणे गरजेचे आहे. मतदार यादीतील किमान 300 घरातील मतदारांशी प्रत्यक्ष भेटून आतापासूनच संपर्क ठेवावा व त्याची पाहणी जबाबदारी असलेल्या उपशाखाप्रमुखाने करावी.

शाखा समन्वयकाने शाखेतील सर्वांशी नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित ठेवण्याचे काम करावे. उपविभागप्रमुखांनी जबाबदारी दिलेल्या शाखांना नियमित भेटी द्याव्यात व गटप्रमुखांना बरोबर घेऊन मतदारांपर्यंत पोहचावे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मागील 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचा कारभार अत्यंत कार्यक्षमपणे चालविला.

मुंबईकरांना पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, वाहतूक इ. अनेक सोयी-सुविधा पुरविल्या. कोस्टल रोड सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या कारकिर्दीमध्ये मुंबईकरांसाठी राबविला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 'करुन दाखविलं' आणि आताच्या गद्दार सरकारने 'घालवून दाखविलं' हे मतदारांच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे.