सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाची आज खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. येत्या 9 ऑक्टोबरच्या होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या रनवेची व इतर सेवा सुविधांची त्यांनी पाहणी केली. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर चिपी विमानतळावर अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आढावा घेतला, तसेच पाहणी केली. 


या चिपी विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय हवाईमंत्री जोतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यासोबत विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी कोणतेही राजकारण करायचं नाही. उद्घाटनाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे महाराष्ट्र सरकारचे MIDC व पर्यटन विभाग प्रोटोकॉलनुसार बोलवतील. तसेच जे येतील त्यांचं स्वागतच आहे, असं म्हणत राणेंना कार्यक्रमाला बोलवणार का यावर बोलण्याचं त्यांनी टाळलं. चिपी विमानतळाच्या नामकरण करण्याची मागणी केली असून संसदपटू अशी ओळख असलेले बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव विमानतळाला देण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे.


चिपी विमानतळासंदर्भात आम्हाला कोणतेही श्रेय घेण्याचा प्रश्न नाही. अवघ्या 2500 रुपयांत सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे याचा आनंद असल्याचं पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं. चिपी विमानतळ कोणी सुरु केलं हे महत्त्वाचे नाही तर विमानतळ सुरू होऊन जिल्हावासीयांना विमानतळ सेवा मिळावी हा हेतू आहे. चिपी विमानतळाला चारही बाजूला रस्त्याची कनेक्टिव्हिटी केली आहे. पिंगुळी ते चिपी विमानतळ रस्ता उद्घाटनापर्यंत खड्डे मुक्त करू त्यानंतर यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र पाऊस गेल्यानंतर हा रस्ता करणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. सुरेश प्रभू यांनी काल पत्रकारांशी औपचारिक बोलतांना चिपी विमानतळ सुरू होत असल्याचं काही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. यावर विनायक राऊत यांनी सुरेश प्रभू यांना बोलवलं जाणार असल्याची माहिती दिली.