Sanjay Raut : सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Disputes) निर्माण होत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊतांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. कोणाला मुंबई तोडायचीय तर कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायची आहेत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु असल्याचेही राऊत म्हणाले. राज्यातील सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तिकडून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा करु नये म्हणजे झालं, असा टोलाही राऊतांनी शिंदे सरकारला लगावला. हे सरकार राज्यात आल्यामुळं, आपण महाराष्ट्राचे लचके तोडू असे अनेक राजकीय दरोडेखोरांना वाटत असल्याचेही राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. राज्यपाल चुकीची वक्तव्य करत आहेत. भाजपचे प्रवक्ते देखील चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत. उपमुख्यमंत्री त्याचे समर्थन करत असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितलं आहे. यावर संजय राऊतांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
आदित्य ठाकरे देशातील प्रमुख तरुण नेत्यांना भेटणार
युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते तेजस्व यादव यांची भेट घेणार आहेत. याबाबत देखील संजय राऊतांना विचारण्यात आलं. यावर राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे बिहारचा दौरा म्हणून बघू नका. ते शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. या दौऱ्याकडं राष्ट्रीय दौरा म्हणून बघा, त्याला राष्ट्रीय दौरा म्हणून महत्व दिलं पाहिजे असेही राऊत म्हणाले. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांच्या मदतीनं परिवर्तन घडवून आणले आहे. अडीच वर्षापूर्वी आम्ही देखील राज्यात परिवर्तन केलं होतं. आता पुन्हा महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची तयारी सुरु झाल्याचा सुचक इशारा राऊतांनी दिला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे हे देशातील प्रमुख तरुण नेत्यांना भेटणार आहेत. देशात तरुण नेतृत्वाची फळी निर्माण करुन एक पर्याय उभा करण्याचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले. त्याला यश येत असल्याचंही राऊतांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या: