Sanjay Raut : आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचा अशीच कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. मात्र, यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री काय करत आहेत? हा आमचा प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नी कठोर भूमिका घेतली होती. पण सध्याचे एकमेव मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी सीमाप्रश्नी तोंड उघडले नाही. त्यांच्या गटाला जी निशाणी दिली आहे ती, ढाल तलवार न देता कुलूप द्यायला हवी. त्याची चावी दिल्लीत असल्याचे राऊत म्हणाले. ते जेव्हा उघडतील तेव्हाच हे बोलतील असे राऊत म्हणाले.
स्वाभिमान गहाण ठेवला का? राऊतांचा शिंदे सरकारला सवाल
कर्नाटक-सीमाप्रश्नावर बोलण्याची यांची हिंमत नसल्याचे म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली. सीमाप्रश्नी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत जोरदार बाजू मांडल्याचे राऊत म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुद्धा ही भूमिका मांडली आहे. तेव्हा हे सगळे कुठे होते? महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पक्ष सोडला म्हणता ना, आता कुठे तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला का? असा सवाल राऊतांनी शिंदे सरकारला केला.
पळकुट्या खासदारांनी सीमाप्रश्नी तोंड उघडलं नाही
शिंदे गटाच्या पळकुट्या खासदारांनी सीमाप्रश्नी तोंड उघडलं नाही, भूमिका घेतली नाही, त्यांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झाल्याचे राऊत म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात की, एक इंचही जमीन देणार नाही. मग अमित शाह मध्यस्थी कसली करणार ? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर बोलावं, ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते. पण हे महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी या प्रश्नावर तोंड उघडले नसल्याचे राऊत म्हणाले.
तुमच्या तिजोरीत जे पैसे येतात ती सुद्धा भीक, असं म्हटलं तर...
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरही खासदार राऊत यांनी टीका केली. ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचाआदर करत नाहीत, त्याच पक्षाचे हे वंश असल्याचे राऊत म्हणाले. तुमच्या तिजोरीत जे पैसे येतात ती सुद्धा भीक आहे असं म्हटलं पाहिजे. जे खोके तुम्ही महाराष्ट्र सरकार आणण्यासाठी वाटले ती सुद्धा एक भीक दिली असंच म्हटलं पाहिजे असेही राऊत म्हणाले. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोक वर्गणीतून संस्था उभ्या केल्या आहेत. एकेकाळी जोतिबा फुले यांचे उत्पन्न टाटा पेक्षाही जास्त होतं. त्यांनी आपली संपत्ती दानधर्मात, शाळा कॉलेज, दलितांसाठी वापरली असल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: