मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची एकमताने निवड झाली. उपसभापतीपदाच्या निवडणुकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या भाजपने यावेळी सभागृहातून सभात्याग केला. त्यांच्या अनुपस्थितीच नीलम गोऱ्हे यांनी आवाजी मतदानाने बिनविरोध निवड झाली. नीलम गोऱ्हे दुसऱ्यांदा विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. नीलम गोऱ्हेंची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं.


उपसभापतीपदाच्या निवडणुकीला आक्षेप घेत भाजपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण कोर्टात असल्याने ही निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र निवडणूक घेण्याचा हा सभापतीचा अधिकार असून तो न्यायालयीन कक्षेत येत नाही, असं सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक घेतली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर आवाजी मतदानानंतर नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली.


मुख्यमंत्र्यांकडून नीलम गोऱ्हेंचं अभिनंदन
"महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो," अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना दिल्या.


नीलम गोऱ्हेंची उपसभापतीपदी निवड योग्यच
"निलम गोऱ्हे यांना सामाजिक प्रश्नांची आणि साहित्याची जाण आहे. त्या मानवी आणि स्त्रियांच्या प्रश्नावर नेहमीच धावून जातात. त्यांची उपसभापतीपदी निवड ही योग्यच आहे," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलम गोऱ्हे यांचं अभिनंदन केलं. तसंच "नीलम गोऱ्हे यांचा पायगुण चांगला असल्यानेच राज्यात पुन्हा सत्ता आली," असंही ते म्हणाले.


पायगुणावरुन दरेकरांचा पवारांना टोलेबाजी
अजित पवार यांच्या पायगुणाच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला. "नीलमताईंच्या पायगुणामुळे तुमची सत्ता आली असली तरी अजितदादांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे अजितदादांनी त्यांच्या पायगुणाकडे आधी पाहावं," असं दरेकर म्हणाले.