मुंबई : "महाराष्ट्रासाठी कोणी काही बोलायला लागलं की त्याच्यावर आरोप करायचे, त्याची बदनामी करायची, त्याच्या चौकशीची मागणी करायची. म्हणजे महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं हा आपल्या देशात गुन्हा झालाय का? असा सवाल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उपस्थित केलाय. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित त्यांना अभिवादन करण्यासाठी आदित्य ठाकरे आज माहीममध्ये आले होते. यावेळी त्यांनी फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे सरकारसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 


आदित्य ठाकरे म्हणाले, "घटनाबाह्य सरकार आल्यानंतर दोन चार घटना घडल्या. 26 जुलैला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की वेदांता येणार आहे, 4 लाख कोटी घेऊन येणार आहेत. MIDC च्या मॅगझीनमध्ये सांगितलं की एक लाख कोटी घेऊन येणार आहे. त्यानंतर 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्री आणि अनिल अग्रवाल यांची भेट झाली.  5 सप्टेंबरला MIDC ने वेदांताला पत्र लिहिलं आहे की आपलं जे काही ठरलंय त्याप्रमाणे MOU करायला आणा. बल्क ड्रग पार्क आपल्या महाराष्ट्रात आला नाही. पण इतर तीन राज्यात गेलं."


शिवसेनेचे बंडखोर आमदार रामदास कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी दोघांचेही नाव घेणं टाळलं. "माझे घरचे संस्कार सांगतात की सत्य बोल. मी त्यांच्यावर लक्ष देत नाही, अशी टिप्पणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली. 


वेदांतबाबत चौकशी केली पाहिजे या आशिष शेलार यांच्या वक्तव्यालाचाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. "चौकशी कोणाची करणार? 
केंद्र सरकारची करणार की? अग्रवाल यांची करणार? असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे का? या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला पण आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. "महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे?  आजच मी पेपरमध्ये वाचलं इथून प्रकल्प तिथे गेला याचं कोणाला दुःख नाही,  याची मला खंत वाटतेय, असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला.  


"आज माझ्या पणजोबांची जयंती आहे. त्यामुळे मी त्यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे. माझ्या पणजोबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला होता. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन देखील आहे, असे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.