मुंबई : फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाय. सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प (C 295 transport aircraft) बडोद्यात होणार आहे. 22 हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पावरून आता विरोधकांनी शिंदे सरकारला घेरलं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रक्लप महाराष्ट्रातून गेला त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की, एअरक्राप्ट प्रकल्प तरी खेचून आणा. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री म्हणाले होते आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू. पण एवढा मोठा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. त्यामुळं हे सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याचं  दिसतंय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.  


नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु, आता या प्रकल्पाचं उद्धाटन 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे फॉक्सकॉननंतर दुसरा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे.  


"वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की, एअरक्राप्ट प्रकल्प तरी खेचून आणा. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री म्हणाले होते आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू. परंतु, त्यांना हे जमलं नाही. हे सरकार स्वत:साठी काम करत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना कोरोनाच्या काळात देखील साडे सहाशे कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली होती. परंतु, आता दोन्ही सरकारं त्यांचीच असताना महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेर जात आहेत. दिल्लीला अनेकवेळा आपल्या स्वत:साठी जातात त्यावेळी याबाबत बोललं पाहिजे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 


शिवसेना नेते विनायक राऊत यांनी देखी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिंदे सरकारचे गेल्या शंभर दिवसात महाराष्ट्रावर उपकार केले आहेत. महाराष्ट्राच्या हिताचा असलेला वेदांता गुजरातला पाठवला, बल्क ड्रग पार्क देखील महाराष्ट्राच्या हातून गेला. आता एअरबस प्रकल्प देखील महाराष्ट्राच्या बाहेर गेलाय. हा प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो देखील महाराष्ट्राच्या बाहेर गेला. आता हा प्रकल्प बाहेर पाठवून शिंदे सरकारने देखील महाराष्ट्राचं भलं केलं असा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय. 


"मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असताना महाराष्ट्राच्या हिताचं गुजरातला पाठवण्याचं पाप एकनाथ शिंदे यांनी केलंय. या पापाचा धडा जनता शिकवेल. सरकारचं अपयश आहेच पण सरकारची लाचारी देखील महत्त्वाची आहे . मुख्यमंत्री पदासाठी इतर लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि लाचारी पत्करली. आता याच लाचारीच्या पोटी हे सगळं घडतंय, असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील शिंदे सरकारवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले असा टोला तपासे यांनी लगावलाय.  "वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयशी ठरत आहेत.  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर (भाजप) नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता आणि गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे. 


दरम्यान, युकेच्या पंतप्रधान लीज यांनी जसा राजीनामा दिला तसा महाराष्ट्राचे हित जपता न आल्याने एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही महेश तपासे यांनी यावेळी केली आहे.


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील हा प्रक्लप गुजरातला गेल्यामुळे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 






भाजप नेते केशव उपाध्ये यांनी मात्र याचे खापर महाविकास आघाडीवरच फोडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाबाबत पाठपुरावा केला नाही. त्यांनी याबाबत एकही पत्रव्यवहार केला असेल तर त्यांनी तो दाखवावा अन्यथा राज्यातील जनतेची माफी मागावी.  सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातला गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका  केशव उपाध्ये यांनी केली आहे.


"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले आहे.