Eknath shinde, Shiv Sena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत मातोश्रीला गेलेल्या शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. या पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना 3 लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यातील 1 लाख रुपयांची मदत  माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि साईनाथ तारे यांनी आज काळे कुटूंबियांना सुपूर्द केली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व देखील शिंदे यांनी स्वीकारले आहे.  

कसारा येथील वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांसोबत भगवान काळे हे मातोश्रीवर गेले होते. बैठक सुरू असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे काळे कुटूंबियांचा एकमेव आधार हरपला होता.

भगवान काळे यांचा मातोश्रीबाहेर वाट पहाताना मृत्यू झाल्याची बातमी सर्वच माध्यमांनी केली होती. मात्र तरीही या कुटुंबाचे साधे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी नाशिक दौऱ्यावर होते. येताना जाताना ते  कसारामार्गेच नाशिकला गेले परंतु तरीदेखील त्यांना क्षणभर थांबून काळे कुटुंबियांचे सांत्वन करावे असे वाटले नाही, याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांना देखील आश्चर्य वाटले. एवढच काय मातोश्री वरून काळे कुटुंबाच्या सांत्वनासाठी साधा संपर्कही कुणी केला नाही.

ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच यांनी त्यांचे सहकारी शिवसेना ठाणे ग्रामीण सचिव साईनाथ तारे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना पाठवून काळे कुटुंबाला तातडीची 1 लाखाची मदत केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दूरध्वनी वरून मयत भगवान काळे यांच्या कुटुंबासोबत संपर्क करून अजून दोन लाख रुपये मदत व मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचे जाहीर केले.  

या दुःखद प्रसंगात आपण काळे कुटूंबियांचा सोबत असून त्यांना लागेल ती सर्व मदत करायला तयार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळे कुटूंबाला सांगितले आहे.