Shivsena : याकूब मेमनच्या  (Yakub Memon ) कबरीच्या मुद्यावरुन भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. या त्यांच्या टिकेला शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. या प्रकरणाशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. भाजप जनतेच्या प्रश्नांकडून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपनं याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबाला का दिला? असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकार किंवा उद्धव ठाकरे यांचा प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सावंत म्हणाले.  शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. दंगल व्हावी यासाठी हे केलं जात असल्याचे सावंत म्हणाले. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील सावंत यांनी केली.


सध्या तक्रारदार पण तेच वकिलदार पण तेच आणि न्यायाधिश पण तेच असे म्हणत सावंत यांनी भाजपवर खोचक टीका केली. मुंबई बॉम्बस्फोटातला (Mumbai Bomb Blast) गुन्हेगार आणि कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण केल्याच्या मुद्यावरुन भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांच्या या टिकेला अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा लगावला. आयुष्यभर भाजप खोटं बोलत आहे. तुम्ही तुमच्या घरात रंग मारला तर त्याला सरकार जबाबदार आहे का ? याला सरकार मान्यता देतं का ? असा सवालही सावंत यांनी केला. याबाबत जे खरं आहे ते समोर यावं, मी त्यामुळं चौकशीची मागणी करत असल्याचे सावंत म्हणाले.


...त्यावेळी राज्यात सरकार कोणाचं होतं? 


2015 ला याकूबला फाशी देण्यात आली होती. त्यावेळी राज्यात सरकार कोणाचं होतं? असा सवालही सावंतांनी उपस्थित केला आहे. मधल्या काळात अशी माहिती आहे की कबरीची जागा विकत घेण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यामध्ये एकाला अटक केली असल्याची माहिती मिळत असल्याचे सावंत म्हणाले. हे हिंदुत्ववादी सरकार जेव्हा सत्तेत होते तेव्हा या मृतदेहाची वाट का लावली नाही भाजपने? असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा या प्रकरणशी कोणताही संबंध नाही. या प्रकरणात शिवसेनेला जोडण्याचा प्रयत्न केला जात असून, याचा आम्ही निषेध करत असल्याचे सावंत म्हणाले.


नेमकं प्रकरण काय?


एबीपी माझानं याकुब मेमनच्या कबरीला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याबाबतचं वृत्त पहिल्यांदा दाखवलं होतं. मेमनला फाशी दिल्यानंतर त्याच्या प्रेताचं दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. त्या ठिकाणच्या ओठ्याला एकंदरीत संगमरवरी बसवण्यात आल्या आहेत. त्यावर एलईडी दिवे लावले होते. हे दिवे रात्रीच्या वेळी चालू असतात आणि मुख्यतः मेमनच्या कबरीवर प्रकाश टाकण्यासाठी लावण्यात आले होते. एका कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून या कबरीसाठी वीजपुरवठा केला जात होता. यावर आता प्रशासनानं अॅक्शन घेतली आहे. आता यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, याच मुद्यावरुन भाजप आणि शिवसेनेने ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: