मुंबई : "मी शिवसेनेत (Shiv Sena) येताच माझ्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली. परंतु, शिवसेनेत प्रवेश करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी सांगितलं होतं की, पूर्वी मी तुमची विरोधक होते. त्यावेळी मी शिवसेनेवर टीका देखील केली आहे. जुने व्हिडीओ काढून लोक तुम्हाला ते दाखवू शकतात. परंतु, त्यावरून तुमचं मत बदलू देऊ नका. मागील अडीच वर्षातील तुमचं काम पाहून मला शिवसेनेत यावं वाटत आहे. परंतु, यावर उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही चुकीच्या वेळी आलात. कारण मी आता तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. माझ्यासाठी हा धक्का होता. कारण लोक पक्षात येण्यासाठी आश्वासनांची खैरात करतात आणि उद्धव ठाकरे यांनी मला माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही असं स्पष्ट सांगितलं, असं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एबीपी माझाच्या (ABP Majha) माझा कट्ट्यावर ( Majha Katta) बोलताना सांगितलं. 


दसरा मेळावा गाजवणाऱ्या शिवसेनेच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी आज माझा कट्ट्यावर त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडला. यावेळी त्यांनी शिवसेनेत येण्यामागंचं कारण देखील सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कालावधीत केलेलं काम आवडलं त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. 


सुषमा अंधारे म्हणाल्या, " उद्धव ठाकरे यांनी मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही हे सांगितल्यांतर मी देखील काहीच मागत नसल्याचं त्यांना सांगितलं. फक्त मला मोकळीक द्या, ज्यामुळे मला राज्यभर माझं काम करता येईल. मला बाकी काहीच नको. एवढं बोलणं झालं आणि चार दिवसांनी कधी प्रवेश करताय म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोन आला. त्यावेळी मी तुमच्या वाढदिवसाच्या दिनी प्रवेश करते असं सांगितलं. त्यानंतर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जुलै रोजी माझा शिवसेनेत प्रवेश झाला आणि मला उपनेते पदाची जबाबदारी देण्यात येत असल्याचं सांगितलं. त्यावेळी मला काहीच समजलं नाही. माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. 


दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी केलेल्या भाषणाची राज्यभर चर्चा झाली. भाषण करताना त्यांनी भगवा गमछा देखील उडवला. याबाबत सांगताना त्या म्हणाल्या, "शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दसरा मेळाव्यात बोलायला संधी देतील असे अनेक जण म्हणाले. परंतु, त्यात काय एवढं असंच मला वाटत होतं. परंतु, नंतर माहिती घेतली त्यावेळी मला कळलं की शिवसेनेच्या दसरा मेळव्यात या आधी कधीच महिला बोलल्या नाहीत. त्यावेळी मला थोडं अवघडल्यासारखं झालं. कारण बोलताना मला माझ्या चळवळीपासून लांब जायचं नाही. शिवाय शिवसेना पक्षाचे विचार देखील महत्वाचे होते. भाषण करताना अंगात काहीतरी संचारलं आहे असंच वाटत होतं. आम्ही लढणारे लोकं आहोत हे माझ्या शिवसैनिकांना दाखवायचं होतं. त्यामुळं मी गमछा फिरवला. माझ्या ध्यानी मनी पण नव्हतं की मी असं करेन. पण संजय राऊत यांना अटक केली त्यावेळी त्यांनी मरण आलं तरी शरण जाणार नाही असं म्हणत गमछा फिरवला हे मला अचानक आठवलं आणि मी ते केलं. योगायोगाने माझ्या गळ्यात त्यावेळी गमछा होता.  


अंधारे यांनी यापूर्वी अनेक पक्षात प्रवेश केला या आरोपांचं देखील यावेळी त्यांनी खंडण केलं. त्यांनी सांगितलं की, "माझा या पूर्वी कोणत्याच पक्षात प्रवेश झाला नाही. कारण मी यापूर्वी चळवळीत काम करत होते. गणराज्य संघ हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्याचं स्वतंत्र काम आहे. हे काम करत असतना मला वाटलं की माझा आवाज कमी पडतोय. त्यामुळेच मी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आले. परंतु, लोक मला राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्याचे बोलतात.  मी राष्ट्रवादीची प्राथमीक सदस्य देखील नव्हते. शिवसेना हा माझा पहिलाच पक्ष असून दसरा मेळाव्यातील माझं पहिलंच राजकीय भाषण होतं.