मुंबई : काल देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी14 ऑगस्ट हा देशाचा फाळणी वेदना स्मृतीदिन म्हणून पाळण्याचं त्यांनी जाहीर केलं.  या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत काही सवाल उपस्थित केले आहेत. फाळणीच्या वेदनेचा दाह फक्त उक्तीने शमणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती देखील करावी लागेल. विद्यमान सत्ताधारी ती कृती करणार आहेत काय? देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो. पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते. ही आग कशी विझवणार?असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.


 त्या वेदनेची खपली उचकटून काढली


सामनात म्हटलं आहे की, दोन्ही देशांमधली दुभंगलेली मनं दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला बस घेऊन गेले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. ही वेदना संपावी हे मोदींच्याही मनात होतेच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली, अशी टीका करण्यात आली आहे.


 वेदनेचा प्रतिशोध घेण्याचं राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधींचं


सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की,फाळणीवर उतारा म्हणून भाजपाने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला. अखंड हिंदुस्थानचा गजर केला. फाळणीच्या वेदनेवर तोच उतारा होता. पण फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचं राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधी करू शकल्या. इंदिरा गाधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली. पाकिस्तानच्या द्वि राष्ट्रवादाचा पायाच उखडून टाकला. फाळणीची वेदना होती व आहेच. फक्त त्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बिजं रोवली जाऊ नयेत, हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवे,  असं देखील शिवसेनेनं म्हटलं आहे. 


अग्रलेखात म्हटलं आहे की, फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस निवडला. हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या, की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा, यावर चिंतन झाले असते तर बरे झाले असते, अशा शब्दांत मोदींवर टीका केली आहे.