मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या घराबाहेर गांधळ घालणाऱ्या 16 शिवसैनिकांना अटक केली आहे.  मुंबईतील खार येथील राणा दाम्पत्याच्या घरासमोर काल शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली होती. त्यामुळे पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना आज अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व शिवसैनिकांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.   


राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला होता. शनिवारी सकाळी नऊ वाजता मातोश्रीसमोर राणा दाम्पत्य हनुमान चालिसाचे पठण करणार होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी शुक्रवारपासूनच मातोश्रीबाहेर तळ ठोकला होता. शिवाय शनिवारी दिवसभर राणा यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने जमा होत शिवसैनिकांनी गोंधळ घातला होता. 


राणा दाम्पत्याच्या घरामसोर मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. परंतु, कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे पठण करणारच यावर राणा दाम्पत्य ठाम होते. त्यामुळे शिवसैनिकही आक्रमक झाले होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅरिकेड्‌सवर चढून राणा यांच्या घरापुढे जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दहा शिवसैनिकांना अटक केली होती. तर नुकतेच आणखी सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. 


या गोंधळानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधातही राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर काल रात्री राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर वांद्रे न्यायालयाने दोघांनाही आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने त्यांच्या जामिनावर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होणार आहे.