Shiv Jayanti 2023: संपूर्ण महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला. एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहेत. शिवनेरी गडावर देखील उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंतरी आणि उपुख्यमंत्री देखील उपस्थित होते. मुंबईत राज्यपालांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून आणि जनतेकडून राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


शिवजयंती निमित्त 3100 चौरस फुटांची रांगोळी; राजमुद्रेत शिवरायांसह अष्टप्रधान मंडळाने साकारली हुबेहूब प्रतिकृती



परभणीत सुदर्शना कच्छवे आणि तिच्या सहकारी कलाकारांनी 5 दिवस सतत काम करून अनोख्या पद्धतीने शिवरायांना वंदन केले आहे. तब्बल 3100 चौरस फुटांत राजमुद्रेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याभोवती अष्टप्रधान मंडळ असलेली रांगोळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शहरातील गांधी पार्कमध्ये ही अतिशय देखणी प्रतिकृती या कलाकारांनी साकारली असून यासाठी 500 पोते रांगोळी या कलाकारांना लागली आहे. शिवरायांसह त्यांचे अष्टप्रधान मंडळ असलेली ही प्रतिकृती पाहण्यासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली आहे. 


Shiv Jayanti 2023 : बीडच्या आष्टीत शिवजयंतीनिमित्त 151 फूट उंच शिवस्तंभाचे लोकार्पण


बीडच्या आष्टी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य 151 फूट उंच शिवस्तंभ उभारण्यात आला असून यावर भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. आष्टी येथील शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा शिवस्तंभ उभारण्यात आला असून यावेळी शासकीय बँड पथकाच्या वतीने ध्वजारोहणाच्या वेळी मानवंदना देण्यात आली.



Shiv Jayanti 2023 : इंदापूरात 21 हजार सुर्यनमस्कारातुन छत्रपती शिवरायांना मानवंदना


पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पतंजली योग समिती आणि युवा भारतच्या वतीने सुर्यनमस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सशक्त निरोगी आणि बलशाली भारत निर्मितीसाठी 21 हजार सुर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण केला.



Shiv Jayanti 2023 : ठाण्यातील चित्रकाराने मोबाईलच्या स्क्रीनवर रेखाटले छत्रपती शिवरायांचे चित्र



आजपर्यंत तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वॉलपेपर मोबाईलच्या स्क्रीनवर ठेवत असाल. परंतू ठाण्यातील एका चित्रकाराने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र मोबाईलच्या स्क्रीनवर रेखाटून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ही कलाकृती ठाण्यातील चित्रकार अविनाश पाटील यांनी रेखाटले असून त्यांना हे चित्र रेखाटण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला आहे.





हिंगोली शहरात शिवजयंतीचा उत्साह, मिरवणुकीत वेगवेगळे देखावे सादर


हिंगोली शहरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सुध्धा या मिरवणुकीत साकारण्यात आला.  लहान लहान शाळकरी मुळे भूमिका साकारताना दिसले.