Amol Kolhe Shiv Jayanti : आज शिवजयंतीच्या दिवशी (Shiv Jayanti) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भगवा जाणीव आंदोलन पुकारलं आहे. किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा फडकत राहावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शिवजन्म ठिकाण असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज मोठ्या उत्साहात शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यावरदेखील त्यांनी बहिष्कार घातला आहे.
शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज उभारण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याने आपण शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घालत असल्याच अमोल कोल्हेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडावरून निघून गेले की, आपण गडावर जाऊन दर्शन घेणार असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे.
2021 पासून केंद्रीय पर्यटन मंत्र्यांकडे या कायमस्वरुपी भगव्या ध्वजासाठी मागणी करत आहोत. त्यांच्यासोबतच पुरातत्व विभागाच्या संचालकांकडेही मागणी केली. त्यावेळी यासंदर्भात सकारात्मक विचार करु असं मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानंतर संसदेच्या अधिवेशनातदेखील हा मुद्दा मांडला होता. संसदेच्या अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीतदेखील ही मागणी केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीदेखील होते. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे भगव्या ध्वजाची मागणी करावी, अशी अपेक्षा होती. मात्र त्याबाबतीत अजूनही पावलं उचलली गेल्याचं दिसत नाही आहे. त्यामुळे हे आंदोलन पुकारलं असल्याचं कोल्हे म्हणाले.
'कोणत्याही कार्यक्रमात अडथळा निर्माण करणार नाही'
आज सगळीकडे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती सोहळा पार पडला. मात्र या सगळ्या सोहळ्याला आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक शिवभक्तांचा हा राष्ट्रीय सण आहे. त्यामुळे शिवभक्तांच्या भावना समजून घेऊन सरकारने मागणीच्या विचार करावा हीच अपेक्षा असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.
बहिष्कार का घातला?
छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असताना अद्याप शिवनेरीवर भगवा ध्वज कायमस्वरुपी फडकावला नाही. त्यामुळे कोल्हे यांनी बहिष्कार घालण्याची भूमिका घेतलेली आहे. कोल्हे स्वतः जुन्नरचे रहिवाशी असून त्यांच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात हा शिवनेरी किल्ला येतो. खासदार कोल्हे यांनी गडावर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावावा यासाठी लोकसभेत ही मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीला कोणी दाद दिली नाही. त्यामुळे आता त्यांनी शिवनेरीवर शासकीय शिवजयंतीवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या मागणीचा पाठपुरावा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावा, अशी मागणीदेखील त्यांनी सरकारकडे केली आहे.