सोलापूर : राज्यभरात शिवजन्मोत्सवाचा उत्साह सुरु आहे. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची 390 जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अभूतपूर्व असा सोहळा पार पडला. रात्री अकरा ते बाराच्या सुमारास शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा पार पडला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा पाळणा सोहळा संपन्न झाला. मध्यरात्री ठीक बारा वाजता सोलापूर जिल्ह्यातील वीरमाता, वीरपत्नी आणि वीरकन्यांच्या हस्ते पाळणा झुलवण्यात आला.


'झुलवा पाळणा, बाळ शिवाजीचा,
चंद्र जसा हा इंद्र शोभतो, पुत्र जिजाऊचा,
झुलवा पाळणा, बाळ शिवाजीचा,
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा,
'झुलवा पाळणा, बाळ शिवाजीचा

या  पाळणा गीताने हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. सोलापुरात पहिल्यांदाच अशाप्रकारच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे मागील एक महिन्यापासून या कार्यक्रमाचे नियोजन सुरु होते. मंगळवारी (18 फेब्रुवारी)  रात्री दहा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांची गर्दी जमायला सुरुवात झाली. पहिल्यांदाच अशाप्रकारचा सोहळा पार पडत असल्याने सर्वच समाजातील महिला आणि पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते. रस्त्याच्या दुतर्फा महिला आणि पुरुषांसाठी स्वंतत्र बैठक व्यवस्था या वेळी करण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ पुतळ्याला शिवनेरी किल्याचे रुप देण्यात आले होते. पुतळ्याच्या भोवती उभारलेला भगवा शामियाना सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. संपूर्ण पुतळ्याच्या परिसराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं होतं. पुतळ्याच्या समोरच राजमाता जिजाऊंचा पुतळा ठेवण्यात आला होता. या पुतळ्याच्या समोरच पाळणा सजवून ठेवण्यात आला होता. त्यात बाळशिवबांची मूर्ती ठेवण्यात आली होती. बाळशिवबाचे हे रुप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रयत्न केले जात होते. 11 वाजून 45 मिनिटांनी वीरमाता, वीरपत्नी आणि वीरकन्यांना पाळण्याजवळ आल्या. त्यांच्याच हस्ते पाळणा हलवून कार्यक्रम पार पडला.

साधारणत: पाळणा सोहळ्यात विधवा महिलांना स्थान दिले जात नाही. मात्र देशाच्या संरक्षणासाठी आपला जीव गमावणाऱ्या शहीदांच्या विधवा आणि मातांना अशा प्रकारे मान देत वेगळा संदेश सोलापुरातून देण्यात आला. पाळणा सोहळ्यासाठी वीरपत्नी सानिया मोहसीन शेख, लक्ष्मी पवार, अलका कांबळे, सुरेखा पन्हाळकर, सिंधु पुजारी, शांताबाई चव्हाण, श्यामल माने, सुनीता शिंदे, मालनबाई जगताप, नंदा तुपसौंदर, हवालदार वर्षा लटके, वीरमाता वृंदादेवी गोसावी, बाई घाडगे यांची प्रामुख्याने उपस्थिीती होती. पाळणा सोहळा सुरु होताच आपला मुलगा, पती, वडील गमावलेल्या वीरमाता, वीरपत्नी, वीरकन्यांचे डोळे देखील पाणावले होते.

महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याहस्ते वीरपत्नी, वीरमाता, वीरकन्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले. पाळणा गीत सुरु होताच हजारो महिलांनी एकमुखाने पाळणा गीत गायला सुरुवात केली. गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजीने आकाश दुमदुमन गेले होते. यावेळी उपस्थितांना मिठाई वाटत आनंद व्यक्त करण्यात आला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यास पोलिसांतर्फे देखील अत्यंत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेकडो महिला पोलिस कर्माचारी यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी होती. सोलापुरातील मेकॅनिकी चौकात बॅरेकेडिंग करुन वाहने दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती. शहारातून चारी बाजूने येणाऱ्या महिलांची पारंपारिक पद्धतीने ओटी भरत स्वागत ही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रात्री आठपासून शिवरंजनीच्या कलवंतानी शिवकल्याण राजा या कार्यक्रमाद्वारे शिवगीते सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी मुस्लीम समाजातील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. पाळणा सोहळा संपताच आसमा सय्यद हिने छत्रपती शिवाजी महारांची जोरदार घोषणा दिली. या घोषणेस दिलेल्या प्रतीसादाने वातावरणात एक नवीन स्फूर्ती निर्माण झाली. रात्री महिला सुखरुप घरी परताव्या यासाठी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाने विशेष खबरदारी घेतली होती. महापालिकेच्या वतीने देखील परिवहन विभागाच्या बसेस यावेळी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.

हा सोहळा पार पडल्यानंतर हजारोंच्या संख्यने उपस्थित असलेले शीवभक्त अंत्यत शांततेत परतले. यावेळी शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल केकडे, महामंडळाचे सल्लागार पुरुषोत्तम बरडे, सकल मराठा समाजाचे माऊली पवार, नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.