अहमदनगर : अहमदनगरच्या कोठे बुद्रुक गावात सध्या आनंदाचं वातावरण आहे. शेतमजुराचा मुलगा असलेल्या महेश हांडेची थेट नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. अथक परिश्रम आणि काहीतरी करुन दाखवायची जिद्द याच्या जोरावर महेशनं हे यश मिळवलं आहे
चारही बाजुंनी डोंगरानं वेढलेल्या कोठे बुद्रुक गावात साधं मोबाईलचं नेटवर्कही पोहोचत नाही. पण, याच गावातल्या एका तरुणानं अथक प्रयत्नातून नायब तहसीलदारपद मिळवलं आहे.
महेशचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करतात. त्याच आई-वडिलांच्या कष्टाचं आज चीज झालं आहे. महेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पण त्यानं कधीच परिस्थितीचं भांडवलं केलं नाही. त्यामुळेच त्याचं यश त्याच्या शिक्षकांना काहीसं वेगळं वाटतं.
2015 मध्ये महेशला अपयश आलं होतं. पण यातून त्याचा आत्मविश्वास ढळला नाही. मित्रांनीही त्याला योग्य वेळी मदत केली. आज त्याच्या या यशानं महेशचे कुटुंबीय, मित्र खुश झाले आहेत. पण महेशला यापुढे जाऊन क्लासवनची पोस्ट मिळवायची आहे.