शिर्डी : पाथरीला साईबाबांचंच जन्मस्थळ घोषित करण्याला तीव्र विरोध करत शिर्डीत आजपासून बेमुदत बंदला सुरुवात झाली आहे. शिर्डीत पहिल्यांदाच बंद पुकारण्यात आलाय. बंद पुकारण्यात आला असला तरी शिर्डीत साई मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. शनिवारी शिर्डीत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी शिर्डीलगतच्या ग्रामस्थांनी देखील हजेरी लावली आणि आजपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय एकमुखानं मंजुर केला. तर दुसरीकडे शिर्डीच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी सुरुवातीला पाथरीच्या रहिवाशांनी देखील बंद पुकारला होता. मात्र, सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्यानं पाथरीवासियांनीं बंद मागे घेतला आहे.


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत 100 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादाला तोंड फुटले. पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, जन्मस्थळाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

साईमंदिर खुले राहणार -
अनिश्चित काळासाठी बंद पुकारल्यानंतर शिर्डीत एकही दुकान किंवा हॉटेल उघडले नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याअगोदर शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकमताने शिर्डीबंदचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीच्या आसपासच्या भागातील नागरिकही यात सहभागी झाले आहेत. पाथरी गावाला 100 नाही तर 200 कोटींची निधी द्यावा, आमचा काहीही विरोध नाही. मात्र, साईंचा जन्मस्थळ म्हणून पाथरीला आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पाथरीच्या ग्रामस्थांचा नेमका दावा काय आहे?
थोर अवतारी पुरूष संत श्री साईबाबा यांचे कर्मस्थान शिर्डी हे जगप्रसिद्ध आहे. मात्र, त्यांचे जन्मस्थळ हे परभणी जिल्ह्यातील पाथरीच आहे. यासाठी आमच्याकडे 29 पुरावे असल्याचा दावा देखील पाथरीकरांनी केला आहे.

बंदला विखेंचा पाठिंबा -
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावरुन शिर्डीकर नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिर्डीच्या लोकांनी केलेल्या बंदला माझा पाठिंबा आहे. अत्यावश्यक सेवा, मंदिर यातून वगळण्यात आले आहे, भाविकांना त्रास होऊ देणार नाही. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर बेमुदत बंद करण्याची वेळ येईल, असा इशारा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावरुन शिर्डीकर नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या वादावरुन इतिहासात पहिल्यांदाच शिर्डी बंदची हाक देण्यात आली. परिसरातील 25 गावं बंदमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

Shirdi | आज रात्री पासून शिर्डी आणि पाथरीमध्ये बेमुदत बंद | ABP Majha