शिर्डी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. राष्ट्रपतींच्या हस्त शिर्डीहून मुंबईच्या दिशेने रवाना होणाऱ्या विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आता मुंबई ते शिर्डी हा प्रवास 40 मिनिटांत पार करता येणार आहे.

त्यानंतर शिर्डीहून हैदराबादसाठीही विमानसेवा आजपासूनच सुरू होणार असल्याची माहिती आहे. संध्याकाळी साडेचार वाजता शिर्डीहून हैदराबादसाठी विमान झेपावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिर्डी ते मुंबई, शिर्डी ते हैदराबादबरोबरच लवकरच शिर्डीहून दिल्ली आणि भोपाळसह अनेक शहरांपर्यंत विमानसेवा सुरू होतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन करणं भाग्य : राष्ट्रपती

राष्ट्रपतींच्या हस्ते साई समाधीच्या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. हे आपलं भाग्य असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. शिवाय आपण गेल्या 26 वर्षांपासून शिर्डीत येतो. इथे येणारा आणि राहणारा प्रत्येक जण भाग्यवान असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिर्डीत येण्यामुळे साईभक्तांना गैरसोयीचा सामना करावा लागला, त्याबद्दल रामनाथ कोविंद यांनी दिलगिरीही व्यक्त केली. सामान्य साईभक्त म्हणून अनेकदा शिर्डीत आलो. मात्र आज राष्ट्रपती म्हणून शिर्डीत आल्याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं.



राष्ट्रपती कोविंद यांच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सजली होती. शहराला छावणीचं स्वरुप आलं होतं. शिर्डीपासून 13 किमी अंतरावर काकडी गावच्या परिसरात 975 एकरावर विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. विमानतळ उद्घाटन आणि साईबाबा समाधीचा शताब्दी महोत्सवाला प्रारंभ या दोन कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद शिर्डी दौऱ्यावर होते.