चंद्रपूर : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जंगलात अडकलेल्या एका मेंढपाळाने तब्बल 2 रात्र जंगलात काढल्याची अतिशय चित्तथरारक बाब समोर आली आहे. ब्रम्ह्य्या उडतलवार असं या 55 वर्षीय मेंढपाळाचं नाव असून तो राजुरा तालुक्यातील देवाडा या गावचा रहिवासी आहे. या मेंढपाळाच्या धर्याचं आता सगळीकडून कौतुक होत आहे. 


बुधवारी सकाळी तो आपल्या मेंढ्या आणि बकऱ्यांना घेऊन जंगलात गेला होता. मात्र, दुपारपासून धो-धो पाऊस बरसायला सुरुवात झाली आणि जंगलातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहायला लागले. त्यामुळे ब्रम्ह्य्या याला जंगलातून आपल्या गावाकडे परतणे शक्य झाले नाही. विशेष म्हणजे तब्बल 2 दिवस पाऊस कोसळत असल्याने या मेंढपाळाला जंगलातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. मात्र, अशा बिकट परिस्थितीत देखील त्याने हिम्मत हारली नाही आणि जंगलात अतिशय धीराने त्याने आपल्या बकऱ्यांसोबत जंगलात 2 दिवस आणि 2 रात्र काढल्या. 


या पूर्ण काळात त्याच्याकडे खायला काहीही नव्हते आणि त्याने फक्त शेळीचं दूध पिऊन आपली भूक भागवली. त्या दरम्यान ब्रम्ह्य्या यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जंगलात खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा काही पत्ता लागला नाही. अखेर शुक्रवारी दुपारी पाऊस थांबल्यावर ते जंगलाबाहेर पडले आणि त्यांच्या कुटुंबीयांची त्यांच्यासोबत भेट घडली. मुसळधार पाऊस आणि दुथडी भरून वाहणारे नदी-नाले अशा परिस्थितीत ब्रम्ह्य्या यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले असावे अशी त्यांच्या कुटुंबियांना सातत्याने भीती वाटत होती. मात्र, अखेर 2 दिवसांनी ब्रम्ह्य्या सुखरूप जंगलाच्या बाहेर आले आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.