Shashikant Shinde on Trumpet: अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीची दोन शकले झाली. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळालं, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस मिळाला. मात्र अपक्षांना मिळालेल्या पिपाणी या साधर्म्य असणाऱ्या चिन्हामुळे मोठा फटका राष्ट्रवादीला बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दोन निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून हे चिन्ह रद्दबातल करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आनंद व्यक्त करतानाच निवडणूक आयोगाला खोचक टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया देत तुतारी चिन्ह कायमचं वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानताना खडे बोल सुद्धा सुनावले आहेत. 

Continues below advertisement






उशिरा सुचलेलं शहाणपण


शशिकांत शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या चिन्हामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मोठा गोंधळ निर्माण झाला, त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागली होती. हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता, तर आज महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय चित्र नक्कीच वेगळं असतं. शेवटी, उशिरा सुचलेलं शहाणपण अस याला म्हणावं लागेल. निवडणूक चिन्हातून ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार! हा निर्णय लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


शशिकांत शिंदे यांना मोठा फटका


पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांमध्ये असलेल्या साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये मते मिळवली होती. इतकेच नव्हे तर शशिकांत शिंदे यांनी सुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. मात्र पिपाणी चिन्हामुळे शिंदे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.  इतकेच नव्हे, तर या संदर्भात उदयनराजे यांनी सुद्धा जाहीरपणे भाष्य केलं होतं. असाच प्रकार बीड लोकसभेला सुद्धा घडला होता. त्यामुळे आता पिपाणी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून कायमस्वरूपी रद्दबातल करण्यात आल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या