Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भाषेत विरोधकांना चांगलाच चिमटा काढला आहे. प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर आज पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचा समावेश झाल्यानंतर मिटकरी यांनी याला "हकालपट्टी साजरी करणाऱ्यांच्या तोंडावर दिलेली सणसणीत चपराक" दिली असल्याचे म्हटले आहे. यावेळी मिटकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेली 'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा...’ शायरी म्हणत हल्लाबोल केला.
दादा म्हणाले, कोणावरही अन्याय होणार नाही
मिटकरी म्हणाले, “वक्तृत्व कलेमुळेच अजितदादांनी मला पहिली संधी दिली होती. तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ठामपणे मांडत आलो आहे. आजही पक्षाच्या विचारधारेबद्दल माझी निष्ठा अबाधित आहे. असं कोणतं वादग्रस्त विधान मी केलं ज्यामुळे मला हटवलं, हेच समजत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “नव्या प्रवक्त्यांच्या यादीत नाव नसल्यामुळे थोडं वाईट वाटलं, पण मी दादांशी स्वतः बोललो. दादा म्हणाले की, कोणावरही अन्याय होणार नाही. आज जेव्हा स्टार प्रचारकांच्या यादीत माझं नाव आलं, तेव्हा स्पष्ट झालं की पक्ष माझ्यावर विश्वास ठेवतो.”
पक्षाने दिलेली सणसणीत चपराक
अजित पवारांविषयी मिटकरी म्हणाले, “माझ्या पक्षाने मला जबाबदारी दिली आहे, ती मी पूर्ण जबाबदारीने पार पाडणार आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर या विचारसरणीशी बांधिल राहून मी पक्षाचा प्रचार करणार आहे.” मिटकरी यांनी आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना चांगलाच टोला लगावला. “हकालपट्टी शब्द वापरल्यानंतर ज्यांना गुदगुद्या झाल्या, त्यांना ही पक्षाने दिलेली सणसणीत चपराक आहे. कोणाचाही अंत पाहू नये, कारण राजकारणात वळणं येतात. पण सत्य आणि निष्ठा कायम एकाच दिशेने उभं राहतात,” असे ते म्हणाले.
पदावरून बाजूला करताच नवीन संधी दिली
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी भाकरी फिरवत अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आणखी दोन प्रवक्त्यांना पदमुक्त केले होते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजित पवारांनी मिटकरी यांची उचलबांगडी केल्याची जोरदार चर्चा रंगली. मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये कटुता निर्माण होते, अशी कुजबुज होती. त्यामुळेच अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांना कार्यमुक्त केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांतच अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या