Shashikant Shinde on NCP Merger: अजित दादांची जी खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्यासंदर्भात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे बांधील असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चर्चा 100 टक्के झाली होती. जयंत पाटील, सुप्रिया ताई, मी आणि हर्षवर्धन पाटील अशा अनेक नेत्यांसोबत ही चर्चा झाली होती. महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर या चर्चेने वेग घेतला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यामुळे आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे विलनीकरण अगोदर होऊ शकले नाही. 12 तारखेच्या बैठकीत असा निर्णय झाला होता की, दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवायची आणि निकाल लागल्यावर पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा, असा गौप्यस्फोट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला.

Continues below advertisement

अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार 

अजितदादांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आता ती पूर्ण करायची की नाही, हा निर्णय त्या पक्षाने घ्यायचा आहे. दादांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, बाकी नेत्यांशी मी बोलेन, मला कोणी विरोध करणार नाही. आज आम्ही सगळे एकत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. अजित दादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर राष्ट्रवादीच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा आहे हे दाखवणे गरजेचे आहे. येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला आम्ही एकत्रितपणे सामोरे जाऊ, असे ते म्हणाले. 

तर आम्ही 'घड्याळ' चिन्हावर का लढतोय? 

शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित दादांची पवार साहेबांशी असलेली अटॅचमेंट कोणाला कळली नसेल, पण त्यांच्याबद्दल दादांच्या मनात प्रेम होते. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली परत एकसंध व्हायचं, अशी भावना अजित दादांनी व्यक्त केली होती. मतांच्या विभाजनाचा फायदा-तोटा विचारात घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सकारात्मक निर्णय झाला होता. काही नेते म्हणतात की अशी बैठक झाली नाही, पण दादांच्या बैठका झाल्या होत्या हे सत्य व्हिडिओमधून समोर आले आहे. जर चर्चा झाली नव्हती, तर आम्ही 'घड्याळ' चिन्हावर का लढतोय? सातारा जिल्ह्यात मकरंद पाटील, नितीन पाटील आणि मी एकत्र बसलो होतो, दादांशी फोनवर चर्चा झाली होती. सोलापूरच्या संदर्भातही दादा रोज साडेआठ वाजता माझ्याशी चर्चा करत होते की कुठे एकत्रित सभा घ्यायच्या आहेत.

Continues below advertisement

त्यांनी सांगितले की, सगळा महाराष्ट्र दुःखात आहे, कुटुंब दुःखात आहे आणि आम्ही सगळे सुद्धा दुःखात आहोत. त्यामुळे या विषयाच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा नव्हती. शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा आहे. मला वाटतं त्यांचा निर्णय अचानक झाला असेल आणि शपथविधीचा निर्णय घेण्यात आला असेल, आम्हाला त्याची कल्पना नव्हती. हा शरद पवार साहेबांचा विषय येत नाही, हा त्यांच्या पक्षाचा विषय येतो. जर पवार कुटुंब एकत्र बसले असते, चर्चा झाली असती, तर पवार साहेबांचा विषय आला असता. हा त्यांच्या कुटुंबाने आणि पक्षाने घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे यामध्ये पवार साहेबांचा विचार करण्याचा संबंध येत नाही, असेही शशिकांत शिंदे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या