Jejuri Shashan Aplya Dari : पुणे जिल्ह्यातील जेजुरीत होणारा 'शासन आपल्या दारी' (Shashan Aplya Dari ) कार्यक्रम चवथ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला पुढचे काही दिवस पावसाचा रेड अलर्ट असल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या आधी विविध कारणांनी जेजुरीतील हा कार्यक्रम तीनवेळा पुढे ढकलण्यात आला आहे. आता चवथ्यांदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.
येत्या 23 जुलैला पुरंदर तालुक्यातील जेजुरीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी तीन वेळा हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे रद्द करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य़मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' आणि जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ऐन वेळी यंदा पावसाचं कारण देत हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
काही प्रमाणात या कार्यक्रमाची तयारी झाली होती. या तयारीसाठी सगळा खर्च करण्यात आला होता. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात येणार होते. त्यात पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच जेजुरीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. बदलत्या राज्याच्या समीकरणानंतर हा कार्यक्रम फार महत्वाचा होता. त्यात जेजुरीत म्हणजेच पवारांच्या बालेकिल्ल्यात होणार असल्याने सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पुढील कार्यक्रम कधी असेल, यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे.
चारवेळा हा कार्यक्रम पुढे ढकलला गेल्याचा सर्वात मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसल्याचं दिसून येतंय. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअरचे दाखले, आर्थिक दुर्बल गटाचे दाखले, यासांठी विद्यार्थ्यांची प्रचंड धावपळ सुरू असते. पण पुण्याच्या तहसील कार्यालयात पडलेल्या चेहऱ्याने शेकडो विद्यार्थी आणि पालक अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या पाहत असल्याचं दिसत आहे.
चौथ्यांदा पुढे ढकलला कार्यक्रम...
या आधी शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी तहसिलदार कार्यालयाने जय्यत तयारी केली होती. सर्वसामान्यांचं काम सोडून सर्व प्रशासकीय यंत्रणा या कार्यक्रमाच्या मागे लागली होती. त्यामुळे सर्वसामान्यांची साधी साधी कामंही रखडली होती. परिणामी नागरिकांना मनस्ताप सहन करायला लागला. अशात आता हा कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे.
हेही वाचा-
Pune Malin Village : अनेक संघर्षानंतर माळीणचं पुनर्वसन; मात्र धोका कायम, नवं माळीण गाव कसं वसलं?